‘आयएसआय’ माजी प्रमुखांवर पाकिस्तानच्या सैन्याचे समन्स

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

हिंदुस्थानच्या ‘रॉ’ या गुप्तचर संस्थेचे प्रमुख ए. एस. दुलत यांच्या सोबतीने ग्रंथ लिहून प्रकाशित केल्याबद्दल ‘आयएसआय’चे माजी प्रमुख असद दुरानी यांच्यावर पाकिस्तानच्या लष्कराने ‘समन्स’ बजावले आहे. दुरानी यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दुरानी हे ऑगस्ट १९९० ते मार्च १९९२ या काळात ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे प्रमुख होते. त्यांनी आणि ‘रॉ’चे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी संयुक्तरीत्या लेखन केलेला ‘स्पाय क्रॉनिकल्स : रॉ, आयएसआय ऍण्ड इल्युझन ऑफ पीस’ या ग्रंथाचे गेल्या बुधवारी प्रकाशन झाले.

पाकिस्तानात ग्रंथावरून वादळ

दुलत आणि दुरानी यांनी संयुक्तरीत्या लिहिलेल्या त्या ग्रंथावरून पाकिस्तानात मोठेच वादळ उठले आहे. त्यातील लिखाणावर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक बोलवावी अशी मागणी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शुक्रवारी केली होती. पाकिस्तानच्या सिनेटचे माजी अध्यक्ष रझा रब्बानी यांनीही त्या ग्रंथाला जोरदार आक्षेप घेतला आहे. असे पुस्तक एखाद्या पाकिस्तानी नेत्याने लिहिले असते तर त्याला ‘देशद्रोही’ ठरवले गेले असते, असे रब्बानी यांनी म्हटले आहे.

असद दुरानी हाजिर हो

दुलत आणि दुरानी यांच्या पुस्तकाला नवाझ शरीफ, रझा रब्बानी यांनी आक्षेप घेतल्यानंतर असद दुरानी यांच्यावर पाकिस्तानच्या सैन्याचे समन्स बजावले. दुरानी यांना सोमवारी २८ मे रोजी सैन्याच्या जनरल हेड क्वॉटर्समध्ये हजर राहण्यास कळवण्यात आले आहे. पुस्तकात त्यांच्या नावे प्रकाशित झालेल्या मतांबाबत स्पष्टीकरण मागण्यात येणार आहे.