पाण्याच्या टाकीचे बांधकाम केल्याने माजी सैनिकाच्या घराकडचा रस्ता बंद

फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । इगतपुरी

शेणीत, तालुका इगतपुरी येथील माजी सैनिक काशिनाथ जाधव यांच्या गावातील घराच्या वहिवाटीच्या रस्त्यात ग्रामपंचायतीने हेतुपुरस्सर पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले आहे. त्यामुळे माजी सैनिक काशिनाथ जाधव यांच्यासह येथील नागरिकांना रस्त्यासाठी सरकारदरबारी खेटा घालाव्या लागत असून मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

इगतपुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन दिल्यानंतर एक दिवस परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गटविकास अधिकारी गावात हजर झाले. सत्य परिस्थिती पाहिल्यानंतर खरोखरच सदर रस्ता टाकीच्या बांधकामामुळे बंद झाला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ ग्रामपंचायतीला दहा दिवसांच्या आत रस्ता मोकळा करून कारवाई करण्याचे आदेश देऊन कारवाईचा अहवाल पाठविण्यात यावा अशा आदेशाचे पत्र दिले. पंधरा दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने ग्रामपंचायतीने गटविकास अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत पंचायत समितीला पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्याकडून पुढील कारवाई सुरू असल्याचे थातूरमातूर उत्तर देण्यात आले. त्यामुळे माजी सैनिक जाधव हे निराश झाले आहेत. हक्काच्या रस्त्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. तथापि प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी लक्ष घालून कारवाईचा शब्द दिल्याने उपोषण रद्द करण्यात आले. एका माजी सैनिकावर हक्काच्या वहिवाटीच्या रस्त्यासाठी कडवा संघर्ष करावा लागत आहे. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावर प्रयत्न करावेत असे पत्रही पंचायत समितीने ग्रामपंचायतीला दिले असून त्यावर ग्रामपंचायत काय तोडगा काढते हे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेतुपुरस्सर वहिवाटीच्या रस्त्यात ग्रामपंचायतीच्या लोकांनी पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले. माझ्यासह येथील नागरिकांचा रस्ताच बंद झाल्याने न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे.
– काशीनाथ जाधव, माजी सैनिक

पाण्याच्या टाकीचे बांधकाम गावठाण जागेत आहेत. रस्ता देण्याचा आमचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तरीही आम्ही काही विशिष्ट वेळेत पर्यायी मार्ग काढून रस्ता मोकळा करण्यासाठी सहकार्य करणार आहोत.
– एस.एन.बोडके, ग्रामसेवक