संस्कृती गड-कोटांची

सदाशिव टेटविलकर...इतिहास आणि गडकिल्ल्यांचे अभ्यासक

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकिल्ले यांचे अतूट नाते आहे. किल्ल्यांच्या माध्यमातून चोहोबाजूंना असलेल्या बलाढय़ शत्रूंना नमवून स्वतंत्र राज्य निर्माण केल्याचे ‘हिंदवी स्वराज्य’ हे जगातील एकच स्फूर्तिशाली उदाहरण आहे.

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा विचार करता जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात, राज्यात महाराष्ट्राएवढे किल्ले नाहीत. शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी ३६० गड-कोट असल्याचे आपल्या आज्ञापत्रात नमूद करून ठेवले आहे. महाराष्ट्रातील या किल्ल्यांना दीड-दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. थळघाट, नाणेघाट, बोरघाट, बाळाघाट, कातुरबाघाट, तैलबैला, पारघाट इत्यादी कोकणातून वर देशी जाणाऱया घाटमार्गावरील प्रवासी व व्यापारी लोकांना संरक्षण देण्यासाठी सातवाहन, शिलाहार व यादव या राज्यकर्त्यांनी अनेक किल्ले बांधले. जीवधन, चावंड, हडसर, शिवनेरी, रतनगड, हरिश्चंद्रगड, राजमाची, वासोटा ते पन्हाळगड हे त्यापैकीच काही किल्ले. छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी प्रचंडगडाला तोरण बांधून स्वराज्याची वाटचाल सुरू झाली. तोरणागडाच्या समोरील मुरूमदेवाच्या डोंगरावर राजगड बांधून स्वराज्याचा कारभार तेथून करू लागले. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या सर्व घडामोडी राजगडाने पाहिल्या आहेत.

sindhudurga-fort-new

पद्मावती, सुवेळा, संजीवनी या पंख्याच्या तीनपातीप्रमाणे रचना असणाऱया व सर्व गडांचा राजा शोभावा असा हा राजगड, बलदंड, अभेद्य होता. पण जयसिंग राजांच्या स्वारीने मोंगलसैन्य राजगडाच्या घेऱयापर्यंत पोहोचले होते. आग्र्याहून सुटका झाल्यावर स्वराज्यासाठी नवीन बळकट जागा ते पाहू लागले. महाराजांना हिंदवी स्वराज्यासाठी राजधानीचे ठिकाण दुर्गम, अभेद्य व अजिंक्य हवे होते. अनेक गडांची पाहणी केल्यावर शेवटी त्यांना रायरीचा पहाड पसंत पडला. त्याबद्दल बखरकार लिहितात ‘गड बहुच चखोट, चौतर्फा गडाचे कडे तासल्याप्रमाणे दिडगाव  उंच, पर्जन्यकाठी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे, असे देखोन बहुत संतुष्ट जाले आणि बोलले तक्तास जागा गड हाच करावा.’ इंग्रज अधिकाऱयांनी प्रथम रायगड पाहिला तेव्हा ते स्तंभितच झाले. गडाची दुर्गमता व अभेद्यता पाहून पूर्वेकडचे जिब्राल्टर म्हणून त्यांनी रायगडाची प्रशंसा केली.

शिवाजी महाराजांनी रायगड आणि सिंधुदुर्ग बांधण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते. दोनदा सुरतेची बेसुरत करून आणलेला अगणित खजिना या दोन किल्ल्यांवरच त्यांनी खर्च केलेला आहे. तत्कालीन कोणत्याही राज्यकर्त्यापेक्षा उंचावर, भव्य व आधुनिकतेची कास धरून स्थापना केलेली हिंदवी स्वराज्याची राजधानी कशी असावी याचा वस्तुपाठच रायगडाच्या रूपाने आपल्यासमोर उभा आहे. सहा तलाव, पाऊणशे खोदीव टाकी अशी पाण्याची चोख व्यवस्था, भव्य राजप्रसाद, राज्यांचे व अष्टप्रधानांचे महाल, राजसभा, नगारखाना, गंगासागर तलावाच्या बाजूने उभारलेले उंच अष्टकोनी मनोरे, त्याच्या मध्यातून थुईथुई उडणाऱया कारंज्याची सोय, राजसेवकांची घरे, गजशाळा, गोशाळा, शस्त्रागार, दारू कोठार, धान्य कोठार, जगदीश्वर मंदिर, शिरकाई मंदिर, मारुती मंदिर आणि शिवरायांच्या समकालीन हिंदुस्थानातील कोणत्याही बादशहाच्या… अगदी दिल्ली, आग्र्याच्या किल्ल्यातही पाहायला मिळणार नाही अशी भव्य बाजारपेठ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गडावरील या नगरीच्या सांडपाण्याचा त्वरित निचरा होणारी फरसबंदी नालीची व्यवस्था, २१ व्या शतकातील नगरपालिकेला लाजवील अशी चोख व्यवस्था होती.

शिवाजी महाराजांची दूरदृष्टी त्यांच्या सागरी किल्ल्याच्या बांधणीतून दिसून येते. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच या परकीय सत्तांना व्यापाराच्या निमित्ताने हिंदुस्थानी सागर किनारी बांधलेल्या वखारी त्यांच्या वसाहती होऊ लागल्या होत्या. पुढे मागे यांच्याशी लढावे लागेल या दूरदृष्टीने त्यांनी सागरी किल्ले बांधावयास सुरुवात केली. विजयदुर्ग, पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, अलिबाग व मुंबईजवळच्या उंदेरी यांचा त्यात समावेश आहे. भुईकोट व डोंगरी किल्ल्यांच्या स्थापत्यापेक्षा सागरी कोटांचे स्थापत्य थोडे वेगळ्या प्रकारचे आहे.

vijaydurga4

जलदुर्ग बांधताना त्याचे संरक्षण महत्त्व, समुद्रातील पाण्याचा प्रवाह, भरती-ओहोटीचा परिणाम व वाऱयाची गती यांचे शिवाजी महाराजांनी सूक्ष्म व बारकाईने निरीक्षण केल्याचे आढळून येते. मालवण बंदरानजीक त्यांनी बांधलेला सिंधुदुर्ग हे लष्करी व नाविक स्थापत्याचे उत्तम उदाहरण आहे. तीन-साडेतीन किलोमीटर लांबीची नागमोडी वळण असलेली तटबंदी दहा मीटर उंच व २ ते ४ मीटर रुंद असून तिला एकूण ५२ भक्कम बुरुज बांधले आहेत. पाया मजबूत व भक्कम व्हावा म्हणून पाचखंडी शिशाचा वापर करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकिल्ले यांचे अतुट नाते आहे. किल्ल्यांच्या माध्यमातून चोहोबाजूंना असलेल्या बलाढय़ शत्रूंना नमवून स्वतंत्र राज्य निर्माण केल्याचे ‘हिंदवी स्वराज्य’ हे जगातील एकच स्फूर्तिशाली उदाहरण आहे.