महाराष्ट्राचे वैभव वाडे…

रतिंद्र नाईक

शनिवार वाडा, विश्रामबागवाडा नाना फडणविसांचा मेणवलीचा वाडा. महाराष्ट्राची समृद्ध परंपरा. आज हे पुरातन वाडे पर्यटनक्षेत्रात पुढे येत आहेत.

पर्यटन म्हणजे गडकिल्ले, निसर्ग सौंदर्य आणि भ्रमंती एवढय़ापुरतेच मर्यादित न राहता ‘पर्यटनाची कन्सेप्ट आता बदलत चालली आहे. पर्यटनात पुरातन वास्तू, ऐतिहासिक मंदिरे याचबरोबर प्राचीन वाडय़ांचाही समावेश होऊ लागला आहे. नैसर्गिक समृद्धीने नटलेल्या महाराष्ट्राला या ऐतिहासिक वाडय़ांचा वारसा लाभलेला आहे. सुमारे दीडशे-दोनशे वर्षे उलटूनही आज खंबीरपणे उभे राहत महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणाऱया या वाडय़ांना पाहण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर परदेशातील पर्यटकही या इतिहासकालीन वाडय़ांना भेटी देत आहेत.

नेरूर चौपाटीवरचा वाडा …सिंधुदुर्ग जिल्हय़ातल्या नेरूर गावातील चौपाटीवरचा वाडाही इतिहासाचा साक्षीदार आहे. नेरूरकर कुटुंबीयांचे वास्तव्य असलेल्या या वाडय़ात चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. या वाडय़ातच दरवर्षी चतुर्थीत गणेशोत्सव साजरा केला जातो. नवसाला पावणारा गणपती या वाडय़ात विराजमान होत असल्याने दरवर्षी पर्यटक या प्राचीन वाडय़ाला भेट देतात.

कुशेवाडा…कोकणच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून सिंधुदुर्गातील कुशेवाडा हा प्रचलित आहे. मालवणात वसलेला कुशेवाडा सुमारे ४०० वर्षांपूर्वी बांधण्यात आला असून हा वाडा तीन मजली आहे. २७ खोल्यांची रचना असलेल्या कुशेवाडय़ात सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी भुयारीमार्ग असल्याचेही काही गावकरी सांगतात.

शेटकरांचा वाडा…कुडाळच्या आकेरी गावात शेटकरांचा वाडा आहे. हा वाडा तसा प्राचीन नसला तरी रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे या वाडय़ास ‘नाईकांचा वाडा’ अशी वेगळी ओळख मिळाली आहे. मालिका संपून बरेच दिवस झाले असले तरी हा वाडा पाहायला आजही गर्दी होत असते.

मेणवलीचा वाडा…सातारा जिल्हय़ातील वाईपासून अवघ्या १० कि.मी. अंतरावर असलेल्या मेणवली येथे नाना फडणवीस यांचा वाडा आहे. पेशवेकालीन या वाडय़ाला २४५ वर्षांचा इतिहास असून सुमारे दीड एकर परिसरात बांधलेल्या या वाडय़ात सहा चौक, दगडी फरशी, चौथरा आहे. सुमारे १५ फुटांचे दरवाजे असणाऱया या वाडय़ाच्या मागील बाजूस नानांनी कृष्णा घाट बांधला आहे.

शनिवार वाडा…पुण्याचे वैभव म्हणून ओळख असलेला शनिवार वाडा १७३२ साली बांधण्यात आला. बाजीरावांचा पेशवेकालीन हा वाडा आजही दिमाखात उभा आहे. तो पाहण्यासाठी देशभरातूनच नव्हेत तर जगभरातून पुण्यात पर्यटक येतात.

विश्रामबाग वाडा…मराठा साम्राज्यातील दुसरे बाजीराव यांचा हा विश्रामबाग वाडा असून १८०७ साली हा वाडा उभारण्यात आला. हा वाडा बांधण्यासाठी त्याकाळी सुमारे साडेतीन लाख खर्च करण्यात आले. या वाडय़ात सध्या टपाल कार्यालय. नगरपालिकेच्या काही कचेऱया व मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्यात आले आहे.

नाशिकचा सरकारवाडा…नाशिकमधील वाडे नवीन पिढीसाठी कुतुहलाचा विषय ठरत आहेत. मेन रोड परिसर, नदीघाट आणि जुन्या नाशिक परिसरात ऐतिहासिक वाडे पाहायला मिळतात. त्यापैकीच पेशव्यांचे मुख्यालय असलेला सरकारवाडा हा नाशिकच्या वैभवात भर घालतो.

पवार बंधूंचा वाडा…जुन्या नाशिकमधून फिरताना कोरीव काम केलेला एक वाडा प्रत्येकालाच खुणावतो. तो वाडा म्हणजे पवार बंधूंचा वाडा होय. स्वातंत्र्य चळवळीतील १९४२ च्या आंदोलनानंतर या वाडय़ाला जास्त महत्त्व प्राप्त झाले. स्वातंत्र्यसैनिक वसंत नारायण नाईक हे या वाडय़ाच्या आधारेच भूमिगत झाले होते.

सरदार हिंगणे वाडा.. नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोदावरीचे पात्र चंद्रकोरीसारखे असल्याने या गावाला चंद्रावती असे नाव पडले. मात्र या नावाचे चांदोरीत रूपांतर झाले. या गावातील मठकरी आणि हिंगणेंचा वाडा इतिहासाची साक्ष देतो. सरकार हिंगणे वाडा आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.