अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी महिलेला सक्तमजुरी


सामना प्रतिनिधी, पुणे

शाळेला सुटी असल्यामुळे नातेवाईकांकडे राहण्यास गेलेल्या बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी महिलेसह चौघांना विशेष न्यायाधीश एस. के. कऱ्हाळे यांनी 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनाविली. सामूहिक बलात्काराच्या घटनेमध्ये महिलेला शिक्षा सुनाविण्यात आलेली ही राज्यातील पहिलीच घटना आहे. मनोज सुरेश जाधव (वय 21), वर्षा धनराज गायकवाड (वय 32), अजय दीपक जाधव (वय 22, तिघेही रा. मुंढवा), प्रशांत गुरुनाथ गायकवाड (वय 28, रा. खराडी) अशी शिक्षा सुनाविण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत बारा वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. 13 एप्रिल 2016 ते 25 मे 2016 या कालावधीत मुंढवा परिसरात ही घटना घडली.

पीडित मुलगी सुट्टी निमित्त नातेवाईकांकडे राहण्यासाठी आली होती. तिला आरोपी वर्षा ही रक्षकनगर येथील आरोपी प्रशांत गायकवाड याच्या फ्लॅटवर घेऊन गेली. त्यानंतर आरोपी मनोज जाधव याच्याबरोबर पीडितेला गप्पा मारण्यास बसविले. दरम्यान, वर्षाने मनोज तुला कसा वाटतो, तू त्याच्याशी बोलत जा, त्याच्याबरोबर लग्न कर, शरीरसंबंध ठेवण्यास सांगून सगळी मदत करण्याचे आश्वासन दिले. याच दरम्यान 14 मे 2016 रोजी वर्षाने पीडितेला मुंढवा येथील पिंगळे वस्ती येथील सदनिकेत नेले. प्रशांत आणि अजयने तिचे हात पाय धरले. त्यानंतर मनोजने तिच्यावर बलात्कार केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले. खटल्यात त्यांनी सात साक्षीदार तपासले. ज्या महिलेने अशा प्रसंगात पीडित मुलीला संरक्षण देण्याची गरज होती, तिनेच इतर आरोपींच्या वाईट कृत्यास साथ देऊन पीडितेला मानसिक धक्का पोहोचवला आहे. हा गुन्हा गंभीर असल्याने आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अ‍ॅड. कावेडिया यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने बलात्कार, सामूहिक बलात्कार, संगनमत, विनयभंग, बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमांन्वये चौघाही आरोपींना शिक्षा सुनावली. सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी मेहर यांनी गुन्ह्याचा तपास केला.