आत्मदहनाचा प्रयत्न करणारे चार शेतकरी ताब्यात

सामना प्रतिनिधी। परभणी

धानोरा मोत्या येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि संचालकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना मंगळवारी परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले. या चौघांपैकी दोघांच्या ताब्यातून रॉकेलचा डबाही जप्त करण्यात आला आहे.

पूर्णा तालुक्यातील धानोरा (मोत्या) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी अ व ब च्या दोन चेअरमन आणि संचालकांविरुद्ध अनेकवेळा उपोषण केल्यानंतरही कारवाई होत नसल्याने शेतकरी नाराज झाले होते. सोसायटीचे चेअरमन, संचालकांविरुद्ध ठोस पुरावे असतानाही कारवाई होत नसल्याने रावण बाबाराव मोहिते, कैलास चंपतराव वाघ, मारोती देवराव मोहिते आणि नरहरी सीताराम मोहिते या चौघांनी १२ फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन कारवाई न झाल्यास २० तारखेला आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

यामुळे मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नवा मोंढा पोलीस ठाणे आणि चुडावा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कडक बंदोबस्त केला होता. दुपारी तीनच्या सुमारास मारोती देवराव मोहिते आणि नरहरी सीताराम मोहिते हे दोघेही रॉकेलचा डबा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी लगेच या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील रॉकेलचा डबाही हिसकावून घेतला. चुडावा पोलीस ठाण्याचे शेख रफीक, एल.बी. पोकलवार, एन.ए. सुजलोड, राहुल चिंचाणे, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश मलपिल्लू, संतोष चाटे, कैलास बायनावाड, पी.व्ही. दीपक यांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन नवा मोंढा पोलीस ठाण्यात हजर केले. त्यानंतर इतर दोघांचा शोध घेण्यात आला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात रावण बाबाराव मोहिते आणि कैलास चंपतराव वाघ हे दोघेही पोलिसांना आढळले. मोबाईल ट्रॅकिंगच्या माध्यमातून पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर या आंदोलकांसह इतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची भेट घेतली. या प्रकरणात २२ फेब्रुवारी रोजी जिल्हा उपनिबंधक आणि लेखाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिल्यानंतर प्रकरण निवळले.