उत्तरेत जीवघेणा उन्हाळा; चार वृद्धांचा रेल्वे प्रवासात मृत्यू

50

सामना ऑनलाईन । झांसी/आग्रा

केरळमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी देशातील अनेक भागांत उन्हाने काहीली होत आहे. अनेक भागांत प्रचंड उकाडय़ाने विक्रम मोडले आहेत. याचा फटका लांब पल्ल्याच्या ट्रेन प्रवाशांना बसला आहे. या उकाडय़ाने केरळ एक्सप्रेसने प्रवास करत असलेल्या चार वृद्ध प्रवाशांचा जीव घेतला. ही घटना आग्रा ते झांसी दरम्यान घडली. हे प्रवासी आग्र्य़ाहून कोईमतूरला जात होते.

10 दिवसांपूर्वी तामीळनाडूतील 68 पर्यटकांचा एक ग्रूप वाराणसी आणि आग्रा फिरायला आला होता. वाराणसी फिरल्यानंतर हे पर्यटक शनिवारी आग्रा येथे आले. काल ते आग्र्य़ाहून केरळ एक्सप्रेसने कोईम्बतूरला निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली. पचय्या (80), बालकृष्ण (67), धनलक्ष्मी (74) आणि सुभरय्या (71) अशी मृतांची नावे आहेत.

सिग्नल न मिळाल्याने जीवावर बेतले

आग्रय़ाहून झांसीकडे निघताना गाडीला सिग्नल मिळाले नाही. त्यामुळे ट्रेन कडक उन्हात उभी करण्यात आली. कडक उन्हामुळे या पर्यटकांचा जीव कासावीस झाला. यातील पाच पर्यटकांची प्रकृती बिघडली. गाडी मध्येच थांबवून ठेवल्यामुळे या पर्यटकांवर उपचार करता आले नाहीत आणि त्यातील चौघांचा मृत्यू झाला. मृतदेह झांसी स्थानकांवर उतरवून त्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली.

रेल्वे प्रशासनाचा उलटय़ा बोंबा 

सिग्नल न मिळाल्यामुळे कडक उन्हाचा त्रास होऊन चार पर्यटकांचा मृत्यू झाल्याचा आरोप रेल्वे प्रशासनाने फेटाळून लावला आहे. गाडीला तांत्रिक कारणांमुळे उशीर झाला असे कारण सांगत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांची प्रकृती आधीच खराब असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण उघड होईल, असेही रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या