सांगलीत पोलिसांनी आरोपीला ठार मारून मृतदेह जाळला

सामना प्रतिनिधी । सांगली

चोरी प्रकरणातील संशयित आरोपी अनिकेत कोथळे (26) याचा पोलिसांनी बेदम मारहाण करून पोलीस कोठडीत खून केला व त्याचा मृतदेह दुसऱया दिवशी आंबोली घाटात जाळून पुरावा नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. संपूर्ण पोलीस यंत्रणेला काळिमा फासणाऱया या घटनेचे तीक्र पडसाद आज सांगली शहरात उमटले. शहर पोलीस ठाण्याला बंदोबस्त लावण्याची पाळी आली. तरीही लोकांनी मोठय़ा संख्येने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारून पोलीस यंत्रणेचा धिक्कार केला. दरम्यान या खूनप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेंसह चार पोलिसांना अटक करण्यात आली असून कामटेंना सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या सर्व प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल व आरोपी पोलीस आहेत म्हणून कुणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

चोरीप्रकरणी सांगली पोलिसांनी सोमवारी अमोल भंडारे आणि अनिकेत कोथळे या दोन आरोपींना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. या प्रकरणाचा अधिक तपास तपास अधिकारी उपनिरीक्षक युवराज कामटे यांचे पथक करत होते. तपासासाठी बाहेर काढले असता हे दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याचा बनाव करून तशी फिर्याद पोलीस ठाण्यात कामटे यांनी नोंदवली होती, मात्र कोथळे याच्या नातेवाईकांनी आपल्या मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून या प्रकरणाची चौकशी करावी या मागणीसाठी काल दिवसभर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला होता. आज या सर्व प्रकरणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आज तातडीने पत्रकार बैठक घेऊन माहिती दिली. चोरीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अनिकेत कोथळे या संशयित आरोपीला सोमवारी रात्री आठ वाजता थर्ड डिग्रीचा वापर करून उपनिरीक्षक युवराज कामटे व त्यांच्या पथकातील हवालदार अरुण लाड, अरुण टोणे, सूरज मुल्ला यांनी बेदम मारहाण केली. या पोलीस मारहाणीत कोथळे ठार झाला. कोथळे मृत्युमुखी पडल्याचे लक्षात येताच कामटे व त्यांच्या सहकाऱयांनी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारात कोथळे याचा मृतदेह पोलीस ठाण्यातून सिव्हिल हॉस्पिटलला नेला. मात्र सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर मॅनेज होत नसल्याचे पाहून दुसरा आरोपी अमोल भंडारे याच्यासह हवालदार लाड याच्या सिलेरो या खासगी गाडीतून आंबोली घाटात नेले व तिथे कोथळे याचा मृतदेह जाळला. मृतदेह अर्धवट जळाल्याचे लक्षात येताच पुन्हा पेट्रोल आणून दुसऱयांदा मृतदेह जाळला.

याप्रकरणी कुणाला काही सांगितल्यास तुलाही अशाच पद्धतीने संपवू अशी धमकी अमोल भंडारे याला दिली आणि भंडारे हा निपाणीजवळ सापडल्याचा खोटा बनाव करून वरिष्ठांना तशी माहिती दिली. मात्र रात्रीपासून दुसरा पूर्ण दिवस कामटेच्या बोलण्यातून वारंवार विसंगती होत आहेत हे वरिष्ठांच्या लक्षात आले व या प्रकरणाचा जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी कसून तपास केला असता हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला.