Lok sabha 2019 देशाचे चार दिग्गज नेते यंदा लोकसभेच्या रिंगणात नसणार!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपले महान कर्तृत्व आणि वक्तृत्वामुळे लोकसभा आणि संसद गाजवणारे चार दिग्गज नेते यंदाच्या 17 व्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून दिसणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि विद्यमान परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, लोकजनशक्ती पार्टीचे 8 वेळा खासदारकी भूषविणारे अध्यक्ष रामविलास पासवान आणि गंगा शुद्धीकरण कार्याला वाहून घेण्याची शपथ घेतलेल्या भाजपनेत्या साध्वी उमा भारती यांनी वैयक्तिक कारणास्तव यंदा लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय दक्षिणेकडील जयललिता आणि द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्या निधनामुळे या दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीत प्रथमच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे.

Lok sabha 2019 भाजप-अपना दलमध्ये आघाडी, जागावाटपाचा तिढा सुटला
Lok sabha 2019 मोदींच्या पावलावर पाऊल, राहुल गांधी 2 जागांवर लोकसभा लढणार?

लोकसभेच्या इतिहासात आपली छाप उमटवणारे अनेक दिग्गज यंदा संसदेत दिसणार नाहीत असे स्पष्ट संकेत आहेत. नव्या रक्ताला राष्ट्रीय राजकारणात वाव मिळावा अशी इच्छा व्यक्त करीत शरद पवार, रामविलास पासवान या नेत्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर प्रकृतीच्या कारणास्तव भाजपच्या तडफदार नेत्या सुषमा स्वराज यांनीही निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचे कळते. याशिवाय भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण आडवाणी, मुरलीमनोहर जोशी आणि युवा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यंदा लोकसभा लढविणार की नाही ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.

14 लोकसभा निवडणुका लढणाऱ्या पवारांचा नकार
महाराष्ट्र विधानसभेत विजयाची परंपरा कायम राखत तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार 14 वेळा लोकसभा निवडणूक लढले आहेत. 2009 मध्ये पवारांनी आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती मतदारसंघ सोडला होता. यंदा माढा मतदार संघातूनही न लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आपल्या घरातील दोन उमेदवार सुप्रिया आणि नातू पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवत असल्याने आपण माघार घेत असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

sharad-pawar-and-parth-pawa

प्रकृतीच्या कारणास्तव सुषमांची माघार
आपली प्रकृती ठीक नसल्याने विश्रांतीची नितांत आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत 1977पासून राजकारणात आपल्या कतृत्वाचा ठसा उमठवणाऱ्या जेष्ठ भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी यंदा लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. चार वेळा खासदार आणि तीन वेळा राज्यसभा सदस्यपद भूषविणाऱ्या स्वराज यांनी आपल्या अमोघ आणि बुध्दित्वपूर्ण भाषणांनी संसद सभागृह अनेकदा गाजवले आहे. स्वराज यांनी हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांत आपल्या नेतृत्वाची चमक दाखवली आहे. लोकसभा लढवणार नसले तरी राजकारणात आपण सक्रिय असू असे मात्र स्वराज यांनी स्पष्ट केले आहे.

sushma-swaraj-new-image

रामविलास पासवान निवडणूक लढणार नाहीत
1969 मध्ये प्रथमच आमदारपद आणि 1977 पासून खासदार म्हणून सतत 8 वेळा लोकसभेचे तर एकदा राज्यसभेचे खासदारपद भूषविणारे बिहारच्या लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख रामविलास पासवान यंदा लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत.

उमा भारती गंगा शुद्धीकरण कार्याला वाहून घेणार
भाजपच्या फायरब्रॅन्ड नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमा भारती यांनीही यंदा राम जन्मभूमीची उभारणी आणि गंगा शुद्धीकरण कार्याला वाहून घेण्याचा निर्धार करीत लोकसभेचे रिंगण सोडण्याचे ठरवले आहे. उमा 1989 मध्ये प्रथम मध्य प्रदेशच्या खजुराहो मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकल्या.त्यानंतर त्यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अनेक वर्षे मंत्री म्हणून काम केले आहे.

लोकसभा 2019 निवडणुकीच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

अशोक चव्हाण राज्यातच राहणे पसंत करणार
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्याला राज्याच्या राजकारणातच रस असल्याचे असल्याचे सांगत लोकसभा निवडणूक लढवायची नाही असे ठरवले आहे. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण नांदेड या चव्हाण यांच्या परंपरागत मतदार संघातून लोकसभा लढवतील असे बोलले जात आहे.

मनेका गांधी कर्नालमधून निवडणूक लढवणार
केंद्रीय मंत्री मनेका गांधी यंदा आपल्या परंपरागत पिलिभीत लोकसभा मतदार संघाऐवजी हरयाणाच्या कर्नाल मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पिलिभीतमधून मनेका यांचे खासदारपुत्र वरुण गांधी यंदा निवडणूक लढवतील असे संकेत आहेत. वरुण यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशच्या सुलतानपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.

आडवाणी, मुरलीमनोहर जोशी, प्रियंका गांधी निवडणूक लढविण्याच्या शक्यतेवरच संभ्रम
भाजपचे दिग्गज नेते आणि देशाचे सातवे उपपंतप्रधानपद भूषविणारे लालकृष्ण आडवाणी, भाजपच्या संस्थापकांपैकी एक वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरलीमनोहर जोशी आणि काँग्रेसच्या युवा नेत्या प्रियंका गांधी यंदा लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे.