कल्याणमध्ये साथीच्या आजाराचे थैमान; लेप्टोचे चार बळी

सामना प्रतिनिधी । कल्याण

कल्याण-डोंबिवलीत महिनाभरापासून साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. काविळ, गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना आता लेप्टोनेही शिरकाव केला असून यामुळे चौघांचा बळी गेला आहे. साथीच्या आजारांनी अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांची संख्या तब्बल 924 आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील तापाने फणफणलेल्या रुग्णांची संख्याच 317 आहे. साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी आणि या रोगांचा फैलाव काढू नये यासाठी आरोग्य विभाग 24 तास ऑनड्य़ुटी असून घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करत आहे.

जुलैमधील मुसळधार पावसानंतर कल्याण-डोंबिवलीत साथीच्या आजारांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली. पालिकेने साथीच्या आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी लसीकरण, जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. मात्र कल्याण रेल्वे स्थानकात रोज हजारो प्रवासी राज्यभरातून आणि देशभरातून येतात. त्यांच्यामुळेच संसर्गजन्य रोग पसरत आहे. याचमुळे काकीळ, गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या काढत आहे. पालिकेच्या विविध रुग्णालयांत संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लेप्टोमुळे तीन रुग्ण दगावल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आरोग्य विभागाने घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणात कल्याण पूर्व नेतीवली येथील ज्योती यादव या 14 वर्षांच्या मुलीचा लेप्टोमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय वालधुनीचा रघुनाथ शिंदे (40) आणि मोहने येथील सुभाष कदम (35) लेप्टोमुळे दगावला आहे. तसेच टिटवाळामध्ये आयेशा शेख (25) हिचा लेप्टोमुळे मृत्यू झाला आहे.

  • रेल्वे, बस स्थानकावर बाहेरून येणाऱ्या रुग्णांच्या तपासणीसाठी खास पथक कार्यरत.
  • पाच हजार घरांतील नागरिकांची आरोग्य तपासणी.
  • लहान मुलांसाठी दवाखान्यांमध्ये स्वतंत्र उपचार कक्ष.
  • प्रत्येक प्रभागात डास प्रतिबंधक, जंतू नाशक फकारणी.
  • पालिकेच्या दवाखान्यात रुग्णांसाठी मोफत औषधे.
  • पालिकेचे दवाखाने 24 तास सुरू राहणार.

कल्याण आणि डोंबिवलीतील प्रत्येकी एक रुग्णालय, चार आरोग्य केंद्र आणि 13 उपकेंद्रांमध्ये रोग प्रतिबंधक कक्ष सुरू करण्यात आला आहे. डेंग्यू आणि लेप्टोचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. – डॉ. राजू लवांगरे, पालिका मुख्य कैद्यकीय अधिकारी.