नगर: वांबोरी घाटात धबधबा पाहण्यासाठी गेलेले ४ तरुण बुडाले

सामना ऑनलाईन । नगर

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील घाटामध्ये धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या ५ तरुणांपैकी चार जण बुडाले आहेत. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हे तरुण धबधब्यावरुन पाय घसरून खाली पडले होते. शुभम अशोक मोरे (केडगाव), गणेश पोपट वायाळ (माळीवाडा), श्रीराम प्रभाकर रेड्डी (केडगाव), युवराज साळुंके (केडगाव), प्रतिक राजेंद्र गायकवाड (सावेडी) अशी या पाच जणांची नावे आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पाच जणांपैकी राजेद्र गायकवाड याचा जीव वाचवण्यात यश आले आहे.

वांबोरी गावाजवळ असणाऱ्या गोरक्षनाथ गड आणि परिसरात सोमवारी जोरदार पाऊस झाला. घाटातील निसर्ग आणि धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी नगरमधील पाच तरुण वांबोरी घाटात दाखल झाले होते. घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या गणपती मंदिरामागे तलावाशेजारी एक उंच धबधबा आहे. उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी हे तरुण त्याठिकाणी गेले. मात्र पाण्याच्या जोरामुळे पाचही तरुण बुडायला लागले. यातील एक तरुण स्वत:चा जीव वाचवण्यात यशस्वी झाला, मात्र इतर चार जण बुडाले. चौघे मित्र दिसत नसल्यामुळे घाबरेल्या राजेंद्रने आपल्या मित्रांना फोन करत या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी, नगर एमआयडीसी पोलीस ठाणे व वांबोरी पोलीस चौकीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. रात्री साडेनऊ वाजता मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.