आधी कुत्रा, मग तरुण; आता कोल्हा; शिर्डी विमानतळावरील अनाहुत पाहुणे संपेनात

सामना प्रतिनिधी । राहाता

शिर्डी विमानतळ धावपट्टी परिसरात कोल्ह्याचा वावर आढळून आल्याने विमानतळ सुरक्षा यंत्रणा चिंतीत असून, अनेक पिंजरे लावूनही कोल्हा सापडला नाही. त्यामुळे सुरक्षारक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. अगदी मोकळ्या जलवाहिन्यांना बोळे लावूनही उपयोग होत नसल्याने सुरक्षारक्षकांकडून सांगण्यात आले.

शिर्डी विमानतळ सुरू झाल्यापासून दोनच महिन्यांत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांनीही शिर्डीला भेट दिली असून, त्यांच्याशिवाय अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तीही सातत्याने भेटी देत आहेत. त्यादृष्टीने सुरक्षाव्यवस्था राखण्यात येत असून, आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. तथापि काही अनाहुत पाहुण्यांनी पहिल्यापासूनच सुरक्षा यंत्रणेची डोकेदुखी वाढवली आहे. विमानाची ट्रायल सुरू असताना पहिल्याच दिवशी ऐन विमान लँडिंग होत असताना एक कुत्रे धावपट्टीवर आले होते. ते हाकलताना सुरक्षा कर्मचाऱ्यांची एकच त्रेधा उडाली होती.

पहिल्याच दिवशी झालेल्या त्या घटनेनंतर उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांना विमानतळ परिसरात येता येणार नाही, याची काळजी घेतली जाऊ लागली. त्याला काही आठवडे उलटत नाहीत तोच एक तरुण भिंतीवरून उडी मारून थेट धावपट्टीवर पोहोचला होता. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तो संगमनेर तालुक्यातील भोळसर तरुण असल्याचे लक्षात आले. विमान कसे असते, ते पाहण्यासाठी तो आल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याला सोडून देण्यात आले.

या दोन घटनांची आठवण ताजी असतानाच, आता काही दिवसांपूर्वी कोल्ह्यासारखा प्राणी धावपट्टी परिसरात काही कर्मचाऱ्यांना दिसला. तेव्हापासून त्याचा शोध सुरू आहे. त्याला पकडण्यासाठी पिंजरेही लावले. धावपट्टी आणि एकूणच विमानतळावरील पाणी बाहेर वाहून जाण्यासाठी लावलेल्या जलवाहिन्यांना बोळे लावून तोंडे बंद करण्यात आली. तरीही काही उपयोग झाला नसून, अधूनमधून तो कोल्हा दिसतच असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्याला पकडण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयोग अद्यापही सुरूच असून, कोल्हा सापडत नसल्याने सुरक्षा यंत्रणेची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे, असे सांगण्यात आले.