मसूद अजहरला मोठा झटका, फ्रांसकडून संपत्ती जप्त करण्याचा निर्णय

सामना ऑनलाईन । पॅरिस

‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहर विरोधात फ्रांसने कठोर भूमिका घेतली आहे. फ्रांस सरकारने मसूद अजहरची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेत त्याला जोरदार झटका दिला आहे. अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या हिंदुस्थानच्या मागणीला पाठिंबा देत फ्रांसने यूएनच्या सुरक्षा समितीमध्ये प्रस्ताव मांडला होता. मात्र चीनने त्याला विरोध केल्यामुळे संयुक्त राष्ट्रांना ही विनंती मान्य करता आली नाही.

मौलाना मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या हिंदुस्थानच्या मागणीला फ्रांससह अमेरिकेनेही पाठिंबा दिला होता. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) बंदी घालावी यासाठी यूएनच्या सुरक्षा समितीमध्ये फ्रांसने प्रस्ताव मांडला होता. मात्र चीनने नेहमीप्रमाणे यात खोडा घातला. चीनने मसूद अजहरविरोधात हिंदुस्थानाने आधी पुरावे द्यावेत. हे पुरावे योग्य वाटले तरच आम्ही त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याला पाठिंबा देऊ, अशी आडमुठी भूमिका घेत प्रस्तावाला विरोध केला होता. या अगोदरही चीनने प्रस्तावाला तीन वेळा विरोध करून प्रस्ताव रोखला आहे. अमेरिकेने देखील चीनच्या भूमिकेचा निषेध केला असून परिपत्रक काढत कठार ताशेरे ओढले आहेत.