फ्रान्सचा दणका, मसूद अजहरची संपत्ती जप्त होणार

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मार्गात चीनने चौथ्यांदा खोडा घातल्यानंतर फ्रान्सने मसूद अजहरला जबरदस्त दणका दिला आहे. त्याची फ्रान्समधील मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय फ्रान्स सरकारने घेतला आहे.

चीनने मसूद अजहरला वाचवण्यासाठी व्हिटो पॉवरचा वापर करून त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील प्रस्ताव रोखला. त्यावरून अमेरिकेसहित अनेक राष्ट्रांनी चीनवर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर फ्रान्सने मसूदची मालमत्ता जप्त करण्याचे उचललेले पाऊल ही मोठी कारवाई मानली जाते.

युरोपीय संघाच्या यादीत मसूद अजहरचे नाव
युरोपीय संघाने तयार केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत मसूद अजहरचे नाव आता समाविष्ट करण्यात येईल, असे फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने आणि परराष्ट्र मंत्रालयाने प्रसृत केलेल्या एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.