भांडुपमधील बोगस कॉलसेंटर उद्ध्वस्त


सामना ऑनलाईन । नवी मुंबई

कर्जाची गरज असलेल्या गरजू नागरिकांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक करणारे भांडुप येथील कॉलसेंटर नवी मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. याप्रकरणी आठ भामटय़ांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या भामटय़ांनी नागपूर, रायगड आणि पुणे जिह्यातील नागरिकांना विशेष लक्ष्य केले होते.
भांडुप येथील ड्रिम्स मॉलमध्ये अल्ट्रा मॅनेजमेंट सर्व्हिसच्या नावाने चालविल्या जात असलेल्या कॉलसेंटरमधून गरजू नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार खारघर येथील एका नागरिकाने नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे केली. त्यानुसार पोलीस उपायुक्त तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गायकर, सहपोलीस निरीक्षक मंदाकिनी चोपडे, पोलीस उपनिरीक्षक भूषण शिंदे यांनी आपल्या पथकासह या कॉलसेंटरवर पाळत ठेवली. हे कॉलसेंटर गरजू नागरिकांची फसवणूक करण्याचा अड्डा असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत रोहित पार्टे, प्रशांत कोटीयन, नीलेश पडवळे, प्रवीण निंबाळकर, राहुल वैराळ, विक्रांत गजमल, परेश दरीपकर, सुमित सावंत यांना अटक केली.
परराज्यात बँकांची खाती
गरजू नागरिकांना या कॉलसेंटरमधून कर्जासाठी फोन केला जायचा. मोठय़ा चातुर्याने त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना कर्जासाठी आवश्यक असलेली रक्कम बँकेच्या खात्यात भरण्यासाठी सांगितली जायची. ही सर्व खाते दिल्ली, नोयडा आणि गाझीयाबाद येथील होती. गरजूंनी पैसे टाकल्यानंतर या खात्यातील पैसे काढून घेतले जायचे.