घराडी नळपाणी योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार, ग्रामस्थांचा आरोप

सामना प्रतिनिधी, खेड

मंडणगड तालुक्यातील घराडी येथील शासकीय नळपाणी योजनेत फार मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत या नळपाणी योजनेच्या चौकशीसाठी आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. २०११ साली सुमारे ३८ लाख रुपये खर्च करून शासनाच्या पेयजल या योजनेतंर्गत या गावात नळपाणी योजना राबविण्यात आली होती. मात्र या योजने अंतर्गत काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी आजही वणवण करावी लागत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

नळपाणी योजनेतील भ्रष्टाचाराची माहिती देण्यासाठी खेड येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ग्रामस्थ प्रवीण सुखदरे यांनी सांगितले की, दुर्गम भागात वसलेल्या घराडी गावचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा यासाठी २०११ साली घराडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पेयजल ही योजना राबविण्यात आली. या योजनेवर तब्बल ३८ लाख २३ हजार १४८ रुपये खर्च करण्यात आला, परंतु या योजनेचे काम करणारा ठेकेदार राजेंद्र महाडिक यांने कामाचा दर्जा न राखल्याने शासनाचे लाखो रुपये खर्च करून राबविण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे काही महिन्यांतच तीनतेरा वाजले.

योजनेसाठी वापरण्यात आलेले पाइप व इतर सामग्री ही निकृष्ट दर्जाची असल्याने योजना सुरू झाल्यावर एक वर्षही ग्रामस्थांना योग्य प्रमाणात पाणी मिळाले नाही. ग्रामपंचायतीच्या तत्कालीन कमिटीने गेल्या पाच वर्षांत ग्रामस्थांकडून प्रत्येक कुटुंबाकडून १ हजार ४४० रुपये प्रतिवर्षी याप्रमाणे ८ लाख ८९ हजार ५६१ रुपये इतकी पाणीपट्टी वसूल केली. शिवाय ग्रामपंचायतीच्या निधीतून ९९ हजार चारशे ८७ रुपये वीजबिलावर खर्च केला. ज्या योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांची तहानच भागली जात नाही त्या योजनेच्या विजेच्या बिलावर एवढा खर्च कसा झाला नळपाणी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग दापोली, गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या, मात्र ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेतली न गेल्याने ग्रामस्थांनी १ नोव्हेंबर रोजी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुखदरे यांनी सांगितले.