घरकुल योजनेच्या नावाखाली महिलेची फसवणूक

1

सामना प्रतिनिधी । नगर

घरकूल योजनेचा धनादेश मिळण्यासाठी 1 हजार रूपये भरावे लागतील, असे खोटे सांगून एका भामट्याने धुणेभांडी करणार्‍या महिलेचे 22 हजार 500 रूपयांची दागिने घेवून पसार झाला आहे. ही घटना काल दुपारी भिंगारच्या आलमगीर भागात घडली. अमिश शरीफ शेख (वय 45,रा.शहा कॉर्नर मदनी मस्जिदजवळ आलमगीर,भिंगार) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

भिंगार येथील आलमगीर भागात राहणार्‍या अमिश शरीफ शेख या काल दुपारी घरासमोर उभ्या होत्या. त्याचवेळी एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवर येवून शेख यांना म्हणाला की, ‘तुम्हाला मिळालेल्या घरकूल योजनेचे धनादेश बँकेत जमा झाले आहेत, ते मिळण्यासाठी एक हजार रूपये भरावे लागतील’ असे त्याने सांगितले. त्यावर माझ्याकडे पैसे नाहीत असे शेख म्हणाल्या. परंतु वेगवेगळ्या भुलथापा देवून दुचाकी चालकाने शेख यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर त्याने पैशाऐवजी दागिने असतील तर ते घेवून या, तुम्हाला बँकेत गेल्यावर धनादेश मिळवून देतो, त्यावर विश्‍वास ठेवून शेख यांनी त्या अनोळखी इसमाकडे दागिने देवून स्वत: दुचाकीवर बसून बँकेत जावू लागले.

परंतु आलमगीरमधील प्रिन्स टॉवरजवळ दुचाकी आली असता त्या इसमाने शेख यांना ‘मी किल्ली घेवून येतो, तुम्ही येथे थांबा’ अशी बतावणी करून मध्येच उतरून दिले. मात्र तो अनोळखी इसम पुन्हा आलाच नाही. त्यानंतर आपला विश्‍वासघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.