मालवण शहरात मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण शहरात मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यावर मोकाट जनावरे  ठाण मांडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. आठवडा बाजारात घुसलेल्या एका जनावरांने तरुणाला जखमी केल्याची घटनाही समोर आली आहे. तर शेतमळे अथवा नागरिकांच्या परसबागेत घुसून शेती व झाडांचे नुकसान होत असल्याने नागरिक संतप्त बनले आहेत.

दरम्यान मोकाट गुरांची समस्या मोठी बनलेली असताना मालवण नगरपरिषद आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मालवण शहरात मोकाट गुरांची संख्या अलीकडच्या काही वर्षात वाढली असून या गुरांच्या उपद्रवामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांमधून वेळोवेळी आवाज उठविल्यानंतर नगरपरिषदेने काही मोकाट गुरे पकडून तात्पुरती दिखाऊपणाची कारवाई केली. मात्र नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही या मोकाट गुरांच्या बंदोबस्तासाठी नागरपरिषदेकडून आश्वासने देण्यापालिकडे कोणतीही ठोस उपाययोजना अद्यापपर्यंत झालेली नाही. या मोकाट गुरांकडून शेतकऱ्यांच्या बागायतीचे नुकसान होत असून गुरे रस्त्यात बसून राहिल्याने वाहनचालकांनाही अडथळा होत आहे.

गेल्या सोमवारी आठवडा बाजारातही मोकाट गुरांनी मोठा उपद्रव माजवीत एका तरुणाला धडक देत जखमी केले होते. मोकाट गुरांच्या बंदोबस्तासाठी पालिकेने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.