‘ नीट’ साठी सरकार सुरू करणार मोफत क्लासेस, खासगी क्लासेसचे वांदे होणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नीट, जेईई सारख्या परीक्षांसाठी केंद्र सरकार कोचिंग क्लासेस सुरू करणार आहे. पुढच्या वर्षापासून हे क्लासेस सुरू होणार असल्याचं कळतंय. केंद्र सरकारने राष्ट्रीय परीक्षा संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेद्वारे नीट आणि जेईई सारख्या परीक्षा घेतल्या जाणार आहे. ही संस्था देशभरातील २६९६ सराव परीक्षा केंद्रं शिक्षण केंद्रात बदलणार आहे. ही परीक्षा केंद्रे ८ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार ही परीक्षा केंद्र नुसती सराव पेपर सोडविण्यापुरता मर्यादीत न ठेवता त्यांचा वापर शिकवणी केंद्रासारखा म्हणजेच क्लासेससारखा करण्याचं ठरविण्यात आलं आहे. गरीब घरातील हुशार मुलांना याचा फायदा होणार आहेत. या केंद्रामध्ये शिकवणीला मे २०१९ पासून सुरूवात होणार आहे.

जेईई नीटसाठीची प्रवेश परीक्षा जानेवारी २०१९मध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी १ सप्टेंबर रोजी अॅप आणि वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे. तिथे नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी क्लासमध्ये होणाऱ्या सराव परीक्षांमध्ये सहभागी होता येणार आहे. याच केंद्रांमध्ये त्यांना झालेल्या चुका कशा सुधाराव्यात याचे मार्गदर्शनही मिळणार आहे.