भयानक! सहकारी डॉक्टरांना इंप्रेस करण्यासाठी त्यानं घेतला 20 रुग्णांचा बळी

14

सामना ऑनलाईन । पॅरिस 

जगात कोण कोणाला प्रभावित करण्यासाठी काय करेल याचा नेम नाही. फ्रान्समध्ये एका डॉक्टरने त्याच्या सहकारी डॉक्टरांना प्रभावित करण्याच्या नादात चक्क 20 रुग्णांचा जीव घेतला आहे. फ्रेडरिक पीचर (47) असे या डॉक्टरचे नाव असून तो भूल तज्ज्ञ आहे. पीचरवर 42 वैद्यकीय दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल असून त्यातील 20 रुग्णांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याअगोदर त्याला बेशुद्ध करण्यासाठी भूल दिली जाते. डॉक्टर पीचर भूल देण्याचे काम करत होता. मात्र पीचर जाणून बूजून रुग्णाची प्रकृती बिघडवण्यासाठी भूलीच्या औषधाच्या बाटलीत विष मिसळायचा. त्यामुळे एनेस्थीसियाच्या दिल्याने काही वेळात रुग्णाची प्रकृती अचानक खालावयची. रुग्णाची तब्बेत बिघडल्याने इतर डॉक्टर मदतीसाठी पीचरला बोलावून घ्यायचे. पीचरला रुग्णाला कशामुळे त्रास होतोय याची माहिती असाची त्यामुळे तो त्याबाबतचे उपचार करून रुग्णाला वाचवायचा. त्यामुळे आपले महत्व सिद्ध होऊन सहकाऱ्यावर याची छाप पडत असल्याचे पीचरला वाटत असे. मात्र असे करताना अनेक रुग्णांचा बळीही गेला आहे. पीचरच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमधील 17 वर्षांच्या कारकिर्दीत 20 रुग्ण दगावले आहेत. तसेच 2017 मध्ये दगावलेल्या आणखी दोन रुग्णांच्या मृत्यी प्रकरणातही पीचर जबाबदार असल्याचा पोलिसांना संशय आहे. डॉक्टर पीचरने मात्र त्याच्यावरील आरोप फेटाळले असून आपण इतरांपेक्षा अधिक प्रतिभावान असल्यामुळे त्यांना खुपते आहे. त्यामुळेच मला लक्ष केले जात आहे असे पीचरचे म्हणणे आहे. डॉक्टर पीचरवरील सर्व आरोप सिद्ध झाल्यास तो फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात मोठा व खतरनाक ‘सीरियल किलर’ ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या