मैत्रीण…मी निसर्गाचा

चिन्मय उदगीरकर

निसर्गाशी एकरूप कशा प्रकारे होता? – निसर्ग ही देवता आहे. जी प्रत्यक्षात दिसते. म्हणूनच तर निसर्गाची ताकद वगैरेसारखे शब्द निर्माण होतात. आपली उत्पत्ती ही निसर्गापासूनच झालेली असल्यामुळे आपली नाळ निसर्गाशी आधीच जोडली गेलेली आहे. निसर्गाची नाळ जोडण्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षांपासून गोदावरी, ब्रह्मगिरी, त्रंबकेश्वर या ठिकाणी आम्ही जलसंवर्धन, जंगल स्थापन करण्याचं काम गेल्या ४ वर्षांपासून आम्ही सुरू केलं आहे.  त्यामुळे जेव्हा मी शूट करत नसतो, तेव्हा मी तिथे जाऊन ते काम करत असतो. लोकांमध्ये कोणती झाडं लावायला हवीत याविषयी जागृती करणं, नदीच पात्र नैसर्गिकरित्या पुन्हा कसं पूर्ण भरून वाहू लागेल. हे सगळं केल्यावर जे मानसिक समाधान मिळतं, मानसिक ताकद निसर्ग देतो त्या ताकदीचा अनुभव घेणं या पातळीवर गेली चार वर्षे काम करत आहोत.

निसर्गाकडून सकारात्मक काय मिळतं? – हो मिळते, हा आपापल्या परीने अनुभव घ्यायचा आहे. ताण असेल तर सहलीला जातो. हे कशामुळे तर एखाद्या बाळाला आईकडे आल्यावर जे समाधान मिळतं तसंच निसर्ग म्हणजे आपली आई तिच्या सहवासात आलो की, आपला ताण हलका होतो. आपलं निसर्गाचं नातं आई आणि बाळाप्रमाणे आहे.

 निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी त्याचं कोणतं रूप जास्त भावतं?- निसर्गाची  सह्याद्री, किल्ले, समुद्र, जंगल ही सगळीच रूपं खूप छान आहेत. पण मला सकाळच्या उगवत्या सूर्यांचं पहाटेचं रूप जास्त भावतं. कारण तो एक नवीन ऊर्जा घेऊन येतो. बरंच काही शिकवतो. आपल्या आयुष्यात दुःखाचे प्रसंग असले तरी नव्याने पुन्हा सर्व उजाडणार आहे, याची जाणीव करून देतो.

निसर्गासोबतचा अविस्मरणीय क्षण? – २७ डिसेंबरला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हिमाचल प्रदेशात गेलो होतो. त्याला देवभूमी म्हणतात. नैनितालला गेलो. तिथला निसर्ग मला प्रचंड भावला. अबुधाबीतला वाळवंटातल्या निसर्गाचं रूपही मोहक होतं. निसर्गाची रूपं वेगळी असली तरी त्यामध्ये सर्वांना जपत, सांभाळत असतो. त्याने वाळवंटात आणि कडाक्याच्या थंडीतही लोकांना जगवलेलं आहे. त्याच्या या गुणाचं मला कौतुक वाटतं.

 निसर्गाशी मैत्री का कराविशी वाटते? – निसर्गासारखा उत्तम मित्र दुसरा कोणी नाही. कारण तो आपलं फक्त हितच चिंतत असतो. त्याच्या सान्निध्यात गेल्यावर तुमची दुःख, ताण, व्याप तो विसरायला लावतोच लावतो. आजकालच्या भौतिक जगात निसर्गाइतका निस्वार्थ मित्र कुठेच मिळणार नाही.

जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात असता तेव्हा काय करायला आवडतं? – पूर्वी ट्रेकिंग, भटकंती हे सगळं करायला आवडायचं, पण आता मला कळतंय की, हे खूप स्वार्थीपणाचं आहे. त्याला काहीतरी आपण द्यायलाही हवंय. त्यामुळे त्याची सेवा करायला मला आवडतो.

 निसर्गासोबत आनंद अनुभवण्याची कल्पना काय असते ?…मी जास्वंदीचं झाड लावलं. आता ते खूप वाढलं. त्याला खूप फुलं येतात. ती मी देवपूजेसाठी वापरतो. हे अनुभवणं अविस्मरणीय आहे.

निसर्गसान्निध्यात खायला काय आवडतं ?.. फळं आणि झऱयाचं पाणी प्यायला आवडतं. त्याच्या सान्निध्यात त्याने निर्माण केलेलं खाण्यातच गंमत आहे.

कामातून मोकळा वेळ मिळाला की पावलं घराच्या दिशेने वळतात की निसर्गात भटकायला ?..निसर्गात भटकायला…

 निसर्ग कधी निराश वाटतो का ?..असं कधी होत नाही. तो तुमच्या मनाचा आरसा आहे. तुम्ही निराश असाल तर तो निराश दिसेल आणि आनंदी असाल तर तो आनंदीच दिसेल.

 माणसाचे निसर्गावर अतिक्रमण होते तेव्हा काय करता?..आपण निसर्गावर होणारे आघात वाचवण्यासाठी काहीतरी करायला हवंच. त्यासाठी दैनंदिन जगण्यातील कृती उदा. प्लास्टिकचा वापर कमी करणे, प्लस्टिकमुक्त घर, कमीत कमी पाण्याचा वापर, आपल्या सोसायटीत एक जरी झाड लावून त्याला खत पाणी घातलं तरी छान निसर्ग फुलेलं हे जरी केलं निसर्गाची हानी आपण टाळू शकतो. एकमेकांमध्ये जागृती करा. शुभेच्छांचे मेसेज करतो तसेच निसर्गाची हानी टाळण्यासाठीचे मेसेजही करा. मी हे सगळं करत आहे. नाशिकला जाताना नदीमध्ये कोणी घाण टाकताना दिसलं की, मी गाडी थांबवून हात जोडून सांगायचो. आपल्याकडे तरुणाईची ऊर्जा आहे,त्यासाठी एक क्षण वेळ काढून निसर्गासाठी दिला तर त्याची अनुभूती येईल.

तुम्ही चुकता तेव्हा निसर्ग काय करतो असं तुम्हाला वाटतं?.. तो सावध करतो सुधारण्यासाठी. तरीही सुधारलो नाही तर तो प्रपात घडवतो.

निसर्गाशी कधी भांडला आहात का?.. नाही, कारण ते मला परवडणारच नाही. त्याच्या जवळ मोकळेपणाने बोललोय, रडलोय.