मैत्रिण


 अजय पूरकर

।।अन्नपूर्णाय नमो नम:।।

 तुमची मैत्रीण..अन्नपूर्णा देवी

 तिच्यातली सकारात्मक गोष्ट…रोजचंच. तरीही रोज नवीन ही तिच्यातली सकारात्मक गोष्ट आहे. पोळ्या आपण रोज करतो. तरीही घरी रोज होणाऱया पोळ्या आपल्यासाठी नवीनच असतात.

तिच्यातली खटकणारी गोष्ट…एखाद्या पदार्थ योग्य पद्धतीने मिळाला नाही की, मला कंटाळा येतो.

तिच्याकडून मिळालेली सुंदर भेट…प्रत्येक नवीन पदार्थ हा अत्यंत चवदार, रुचकर पद्धतीने माझ्या समोर येतो तेव्हा ती मला मिळालेली सुंदर भेटच असते.

 तिच्या प्रेरणेने कोणते पदार्थ करायला शिकलात…मी कल्पकता शिकलो. वेगवेगळे पदार्थ तयार करणे हा तिचा गुण माझ्यात आणण्यासाठी पदार्थावर नवे प्रयोग करायला शिकलो. चहा, मुळ्याचा चटका असे काही सोपे झटपट होणारे पदार्थ करायला शिकलो.

तिचा आवडता पदार्थ…जो दुसऱयाच्या चेहऱयावर हास्य, समाधान, आनंद आणतो तो प्रत्येक पदार्थ तिला आवडतो.

एखादी नवीन केलेली रेसिपी फसते तेव्हा..नवीन पदार्थाची योजना करावी लागते. केलेल्या पदार्थाला नवं रूप दिलं की तिची कळी खुलते.

 दोघांचे भेटण्याचे ठिकाण..माझ्या घरातलं स्वयंपाकघर.

एकमेकांसाठी वेळ देता का ?..हो आम्ही सकाळ, संध्याकाळ एकामेकांबरोबरच असतो.

तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण..पहिल्यांदा केलेला पदार्थ जेव्हा उत्तम होतो तो क्षण.

तुम्ही चुकता तेव्हा ती काय करते…पुन्हा पुढच्या वेळेस चूक होणार नाही, केलेली चूक सुधारता कशी येईल यासाठी प्रयत्न करायला शिकवते.

भांडण झाल्यावर काय करता ..तिच्याशी कधीही भांडण होत नाही.

 तिचं वर्णन – एक हसतमुख सुंदर स्त्री. जिचं कार्य फक्त दुसऱयांना समाधान देणं एवढंच आहे.

तुमची एखादी तिला न आवडणारी सवय – घाई गडबड करणे.

तुमच्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या?…सकाळी उठल्यावर पहिल्या काही तीन चार लोकांची आपल्याला आठवण येते. त्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव असेल तर ती तुमची खरी मैत्री असते. रोज सकाळी पहिल्यांदा मला तिची आठवण येते आणि आपोआप मी स्वयंपाकघरात जातो. दिवसाची सुरुवात तिच्या सहवासानेच होते.

 तिच्यामुळे तुमच्या चेहऱयावर कसं हसू येतं?..एखादा पदार्थ चांगला होतो तेव्हा आपसूकच माझ्या चेहऱयावर हसू येतं. त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही.

तिच्याशी मैत्री करावीशी का वाटली?..तिच्या मैत्रीशिवाय आयुष्य निरस होईल. महत्त्वाचं म्हणजे कलात्मकता आणि दुसऱयाला तृप्त करण्याचं समृद्ध भांडार तिच्याकडे असल्यामुळे तिच्याशी मैत्री करावीशी वाटली.