जास्त मार्क मिळवते म्हणून मैत्रिणीला पाजले विष

सामना ऑनलाईन । भोपाळ

अभ्यासातील स्पर्धेमुळे आठवीत शिकणारी एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशात घडली आहे. आपल्यापेक्षा मैत्रिणीला परीक्षेत जास्त मार्क मिळत असल्याने तिच्याबद्दल मत्सर निर्माण झालेल्या या मुलीने मैत्रिणीच्या वॉटरबॅगमध्ये विष टाकून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर आपलं बिंग फुटेल या भितीने तिने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोघीना रूग्णालयात अतीदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मध्यप्रदेशमधील सतना जिल्हयातील ही घटना आहे. येथील खासगी शाळेत एकाच वर्गात शिकणाऱ्या या दोघी मैत्रिणींची चांगली गट्टी होती. एकत्र अभ्यास करणं, फिरायला जाणं, शॉपिंगला जाणं असा त्यांचा दिनक्रम होता. पण यातील एकजण अभ्यासात दुसरीपेक्षा पुढे होती. यामुळे दुसरीला घरातले सारखे अभ्यास करण्याच्या सूचना देत व तिच्या हुशार मैत्रिणीचे कौतुक करत. परिणामी तिच्या मनात हुशार मैत्रिणीबद्दल आकस निर्माण होऊ लागला होता. मैत्रिणीची प्रगती तिला सहन होत नव्हती. यातूनच मग त्या हुशार मैत्रिणीचा कायमचा काटा काढण्याची तिने योजना आखली.

दुसऱ्या दिवशी मधल्या सुट्टीत दोघी एकत्र बसल्या असता तिनं हुशार मैत्रिणीकडे पाणी मागितलं. मैत्रिणीने तिची वॉटरबॅग देताच तिचं लक्ष नसल्याचं बघत हिनं त्यात विष टाकलं व तिला वॉटरबॅग परत केली. त्यानंतर दोघीजणी वर्गात परतल्या. काहीवेळाने तहान लागली म्हणून त्या मैत्रिणीने वॉटरबॅगमधलं पाणी प्यायलं. पण नंतर तिची तब्येत बिघडली. तिला उलट्या व पोटदुखीचा त्रास होऊ लागला. शिक्षकांनी तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी तिच्या पोटात विष गेल्याचं तपासणीत समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तिच्या शाळेतील मित्र-मैत्रिणींकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. यामुळे हादरलेल्या त्या मैत्रिणीने आपण पकडले जाऊ या भितीने विष प्राशन केलं. यामुळे पोलिसांना संशय आला व त्यांनी तिची चौकशी केली असता तिनेच मैत्रिणीला पाण्यातून विष दिल्याचं समोर आले.