लेखकाच्या घरात…शब्देविण संवादणारी लेखणी


अनुराधा राजाध्यक्ष

बाबांच्या काकांकडे डेंगवे गावात जन्म झाला माझा… ते माझं पहिलं घर… बाबा म्युनिसिपालटीमध्ये कामाला होते… त्यांना रजाच मिळाली नाही. त्यामुळे पहिले सहा महिने त्यांनी पाहिलंच नव्हतं मला. नंतर आलो मी राहायला गिरगावात, बाबांच्या घरी. अजूनही मी बाबांच्याच घरात राहतो. चकालाला. माझ्या नावावर घर नाही अजून.’ देवेंद्रनं ही खंत व्यक्त केली आणि मग त्याच्या बाबांच्या गिरगावातल्या घराबद्दल, तो भरभरून बोलत राहिला.

‘गिरगावातलं माझं घर, हॅपनिंग घर होतं.. १८० स्क्वेअर फूटचंच होतं ते… चाळीतलं. टिपिकल. दोनच खोल्या. किचन आणि बाहेरची खोली, कम बेडरूम, कम बैठकीची खोली. ३ फॅमिलीज रहायच्या त्या घरात. बाबांची, त्यांच्या सख्ख्या भावाची आणि चुलत भावाचीसुद्धा… १३ जण राहायचो एकूण आम्ही त्या घरात. एकत्र. पण खरं सांगू, त्या तीन फॅमिली वेगळ्या फॅमिलीज होत्या असं फक्त म्हणायचं म्हणून म्हणायचं. आम्हाला ती तीन वेगळी कुटुंब वाटलीच नाहीत कधी.’ देवेंद्र हे म्हणाला आणि मला वाटलं, सगळ्यांना सामावून घेणारं घर होतं ते. म्हणजे भौतिकदृष्टया १८० स्क्वेअर फुटांचं असलं तरी सगळ्यांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारत एकत्र बांधून ठेवण्याची त्या घराची क्षमता होती. एखाद्या कर्त्या पुरुषासारखी. सगळ्यांना सांभाळून घेत होतं ते घर, म्हणजे ते घर नक्कीच मोठं होतं. देवेंद्र पुढे म्हणाला, ‘गिरगावातल्या त्या १८० स्क्वेअर फुटांच्या घरातच माझ्या कितीतरी माणसांशी गाठीभेटी घडवून आणल्या. कितीतरी व्यक्तिरेखा मला भेटल्या तिथे.’ ती माणसं, त्यांचे स्वभाव, त्यांच्या लकबी, राग, लोभ, भांडणं, आपुलकी झिरपत गेली त्याच्यात… म्हणूनच त्याच्या लिखाणात कळत नकळत त्या व्यक्तिरेखांचे पडसाद उमटत गेले.

जुन्या कठडय़ावर हात ठेवून, सहज दोन-दोन तास गप्पा मारत उभी राहायची मंडळी.. सगळी हृदयाला जोडलेली माणसं त्या चाळीतल्या घरानं देवेंद्रला दिली. ‘माझे बाबा म्युनिसिपालटीत नोकरी करायचे, पण नाटकाचं खूप वेड होतं त्यांना. ‘अमल थिएटर्स’ ही संस्था स्थापन केली होती त्यांनी. ते नाटक लिहायचे, दिग्दर्शितसुद्धा करायचे. मी ही जायचो तेव्हा तालमी बघायला. नाटकाचे संस्कार त्यातूनच झाले माझ्यावर. बाबा मला रोज झोपताना गोष्ट सांगायचे. त्यामुळे गोष्टींची आवड निर्माण झाली. मीसुद्धा माझ्या मुलांना रोज नवीन गोष्ट सांगितली आहे. देवेंद्रचा कल्पनाविलास, हा अशा गोष्टी ऐकण्याच्या आणि सांगण्याच्या वारसा संस्कृतीतून बहरत गेला. कथानकाचं बीज रुजून त्याचं फुलणं आणि त्याचा उत्कर्षबिंदू हे सगळेच कल्पनांचे खेळ आणि त्या कल्पनांना अनुभवांची, पाहिलेल्या माणसांची आणि त्यांच्या स्वभावाची जोड.

माणसांचा शोध घ्यायची ही सवय गिरगावच्या घरात जडली त्याला.. ‘बाबांच्या संस्थेत रसिक किराडसारखा अफलातून ऍक्टर होता. काय एनर्जी होती त्यांच्याकडे. आणि ग्रेससुद्धा. मग नंतर मी माझा ग्रुप स्थापन केला. अनामय नावाचा. त्या संस्थेमार्फत एकांकिका करायला लागलो. १९८६ साली इंडो सोव्हिएट कल्चरल सेंटरची स्पर्धा होती तेव्हा , मीच लिहायचं ठरवलं. लिखाण, दिग्दर्शन ,अभिनय, अशा तिन्ही आघाडय़ांवर लढलो.. ‘वरच्या गाठी’ ही ती एकांकिका. मी ती बाबांना वाचून दाखवली. ते नंतर किचनमधे गेले आणि आईला म्हणाले, ‘आपला मुलगा खूप मोठा होणार.’ हे अर्थातच मी बाहेरच्या खोलीतून ऐकलं. १८० स्क्वेअर फूटच्या त्या घरात, एका खोलीतलं दुसऱया खोलीत ऐकू येऊ नये, म्हणून आवाजाची पट्टी किती खालची ठेवावी, हे त्यांना नाही लक्षात आलं. अभिनेते नव्हते ना ते. देवेंद्र हसत हसत म्हणाला खरा… पण तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होतं.. मग मलाही म्हणाला, ‘आजवर कोणत्याही मुलाखतीत डोळ्यात पाणी आलं नव्हतं माझ्या..’

लेखक म्हणून देवेंद्रचा प्रवास ‘वरच्या गाठी’पासून सुरू झाला आणि याच वरच्या गाठीनं त्याची आणि संगीताची लग्नगाठ बांधली.. या रेशीमगाठी वरतीच बांधल्या गेलेल्या असतात. हे शब्द शब्दशः खरे ठरले या ‘वरच्या गाठी’ एकांकिकेनं. संगीता उलगडत गेली त्या रेशीमगाठीचे रेशीम धागे. ‘मला देवेंद्रनं लग्नाचं विचारलं, पण मी नकार दिला. कारण माझ्या घरातून या प्रेमविवाहाला मंजुरी मिळेल, असं मला घरातल्या इतर पूर्वानुभवावरून वाटलं नव्हतं. मी एकुलती एक. त्यामुळे आई-वडिलांना दुखावून मला लग्न करायचं नव्हतं.  मग या वरच्या गाठी पृथ्वीतलावर प्रत्यक्षात कशा आल्या, याचं एक भन्नाट वास्तव देवेंद्रनं सांगितलं. ‘संगीताची आई, मुकी आणि बहिरी आहे. मी त्यांच्या घरी जायचो तेव्हा तिच्याशीही संवाद साधायचो. भाषेचा अडसर पार करत, संभाषण करायचो. तिला मी हे सांगितलं की ‘तुमच्या मुलीशिवाय मी जगू शकत नाही’. साधं सोपं एक वाक्य हे, पण तिच्या भाषेत, म्हणजे हातवारे करत आणि तोंडातून निघणाऱया वेगवेगळ्या आवाजातून सांगण्याचा माझा हा प्रयत्न सुरू झाला आणि त्या प्रयत्नात तिच्या आईचा आणि माझा शब्दाविना संवाद घडू लागला.. तिचं प्रत्येक म्हणणं, मला बिनबोभाट, सहज समजायला लागलं. प्रश्न, गैरसमज, या सगळ्या अडथळ्यांना पार करत, माझं प्रत्येक म्हणणं तिला आणि तिचं बोलणं मला समजायला लागलं.

हळूहळू आम्ही तासनतास गप्पा मारायला लागलो. तिच्या भाषेत. आणि तेव्हा तिच्यावर नितांत प्रेम करणाऱया माझ्या सासरेबुवांना, माझ्यातला संवेदनशील माणूस जाणवला असावा. माझ्यातलं टॅलेंट पटलं असावं. त्यांनी लग्नाला होकार दिला तो याचमुळे.’

‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचा जन्म, या संवादाच्या प्रक्रियेचं फलित आहे.. कारण त्या शब्दविरहित संवादातूनच, मुका, बहिरा, आंधळा, अशा अफलातून त्रिकुटाची निर्मिती देवेंद्रला करावीशी वाटली. ‘विसंवादातून संवाद’ ही थीम त्याला त्यामुळेच सुचली. लोकांनी ‘ऑल द बेस्ट’साठी दिग्दर्शक देवेंद्र पेमला जरी लेखक देवेंद्र पेमपेक्षा झुकतं माप दिलं असलं तरी देवेंद्र हे आवर्जून सांगतो की, त्यामध्ये ‘मुक्याचे’ पान-पान भर संवाद लिहिले होते त्यानं.. कारण कशावर आ उ आऊ करायचं आणि हातवारे करायचे हे आधी माहीत तर असायला हवं ना… मला सांगताना देवेंद्र आणि संगीता दोघंही भावूक झाली होती..’

लाली लीला हे सयामी जुळ्यांवरचं नाटक लिहिताना ते पहिल्यांदा दोन मुलांचं असेल असं मला वाटत होतं. पण नंतर वाटलं की या सयामी जुळ्या मुली असतील, तर त्यातला संघर्ष आणि नाटय़ अधिक गहिरं होईल.’ देवेंद्रनं सांगितलं.. एकमेकींना पाठीकडून जोडल्या गेलेल्या या दोघीजणी विनोदाचा हात धरत त्यांचं जगणं प्रेक्षकांसमोर उलगडत नेतात आणि आपण दोघीजणी एकमेकींशी जोडलेल्या गेलेलो असलो कायमच्या, तरीही समोरासमोर येऊन आपण कधीच एकमेकींना भेटू शकत नाही या वेदनेच्या शिखरापर्यंत प्रेक्षकांना आणि वाचकांना नेऊन ठेवतात.. देवेंद्रचा विनोद, वास्तवाला विसरत नाही, म्हणूनच तो अधिक श्रेष्ठ ठरतो.’

देवेंद्र प्रेम… तो उत्तम शिक्षक आहे. तो हातचं राखून न ठेवता शिकवतो.’ हे जेव्हा संगीता आवर्जून सांगते, तेव्हा तिच्या डोळ्यातला त्याच्याबद्दलचा अभिमान प्रकर्षानं जाणवतो. ‘मला पहाटे कधीतरी जाग येते. तेव्हा तो लिहित बसलेला असतो.’ हे ती सांगते तेव्हा जाणवतं की, सगळं जग झोपलेलं असतं, तेव्हा त्याच्या लेखणीला जाग आलेली असते. खूप काही करूनही बरंच काही करायचं शिल्लक असल्यानं, स्वतःच स्वतःला प्रेरणा देत ध्येयाचा पाठलाग करणारा देवेंद्र पेम सध्या दोन नाटकांच्या तालमीत व्यस्त आहे. गिरगावातल्या त्या १८० स्क्वेअर फूटच्या घरानं, त्याला जगण्याकडे ३६० अंशातून बघायला शिकवलं आणि दुःखाला हसत हसत बाजूला सारताना हसरं दुःख आपल्या लेखणीतून जगाला सांगायचं सामर्थ्य दिलं. हे त्याच्या शब्दशब्दातून उलगडत गेलं.