पेट्रोल–डिझेल दर कमी होणार नाहीत, भाजपने ठणकावले

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या भडक्याविरोधात काँग्रेससहित तब्बल 22 राजकीय पक्षांनी आज एकीकडे ‘हिंदुस्थान बंद’ पाळला. तर दुसरीकडे मोदी सरकारने मात्र ती इंधन दरवाढ मुळीच कमी होणार नाही, असे स्पष्ट शब्दांत ठणकावले. या संदर्भात केंद्रीय कायदामंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडतानाच विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

पेट्रोल-डिझेल या इंधनाचे दर कमी करणे आमच्या सरकारच्या अजिबात हातात नाही असे प्रसाद यांनी स्पष्ट करून टाकले. ते पुढे म्हणाले की, इंधन दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. कच्च्या तेलाचे भडकलेले भाव पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला कारणीभूत आहेत. या इंधन दरवाढीत सरकारचा कोणताही हात नाही. ही दरवाढ कमी करणे सरकारच्या हातात नाही.

अमेरिकेने इराणवर घातलेल्या बंदीमुळे इंधन दरवाढीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंदुस्थानला तेल आयात करून मिळत असते. पण जागतिक बाजारात सध्या तेलाची कमतरता आहे. तेल उत्पादक देशांच्या समूह ‘ओपेक’ने तेलाची उत्पादन मर्यादा कमी केली आहे. तेलाचे दर केंद्र सरकार ठरवत नाही, असे केंद्रीय कायदामंत्र्यांनी सांगितले.

विरोधकांनी पाळलेल्या आजच्या ‘बंद’ला देशातील जनतेने नाकारले आहे, असा दावाही प्रसाद यांनी केला. ‘हिंदुस्थान बंद’च्या नावाखाली विरोधकांनी देशभर हिंसाचार केला असा आरोप करतानाच बिहारमधील जहानाबाद येथे एका चिमुरडीचा बंदमुळे मृत्यू झाला. याला जबाबदार कोण असा, सवालही त्यांनी केला. या प्रश्नाचे उत्तर राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेसने आधी द्यावे, असेही प्रसाद म्हणाले.

हिंदुस्थान कधीही बंद होणार नाहीः नकवी

भाजप नेते, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी इंधन दरवाढीच्या विरोधात विरोधी पक्षांनी पाळलेल्या ‘बंद’ची खिल्ली उडवली. हिंदुस्थान हा असा देश आहे की, जो कधीही बंद होणार नाही. त्याची कायम प्रगतीच होत राहील, असे सांगतानाच विरोधकांच्या ‘महाआघाडी’चा फुगा लवकरच फुटेल, असे भाकीत त्यांनी केले.