अंगावर गाडी घातली तर गुंडांना स्वसंरक्षणार्थ गोळ्या घाला, पोलिसांना आदेश

2

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

दारु तस्करांच्या हल्ल्यात शहीद झालेले चंद्रपूरचे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना पोलीस मुख्यालयात शोकाकूल वातावरणात मानवंदना देण्यात आली. यावेळी बंदुकीतून तीन फैऱ्या झाडण्यात आल्या. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि पोलीस दलातील वरिष्ठांनी चिडे यांना पुष्पांजली वाहून श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुंडांशी आता कठोरपणे वागण्याच्या सूचना दिल्या आहेत. रेड्डी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की “चंद्रपूर जिल्हा शांत जिल्हा असल्याने नाकाबंदीच्या वेळी पोलीस शस्त्र सोबत बाळगत नव्हते. आता आम्ही निर्देश दिले आहेत की पोलिसांनी शस्त्र सोबत बाळगावे. जर कोणी अंगावर गाडी घालत असेल आणि त्यात जीव जाणार असेल तर स्वसंरक्षणार्थ गाडी चालवणाऱ्यावर गोळ्या झाडण्याचे निर्देश दिले आहेत”

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे ठाणेदार म्हणून कार्यरत पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना मंगळवारी अवैध दारुची वाहतुक करणाऱ्या वाहनाने चिरडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ४१ वर्षीय चिडे यांचा हा मृत्यू पोलीस दलाला हादरवून गेला. रात्री त्यांचा मृतदेह चंद्रपुरातील घरी आणला गेला आणि सकाळी अकरा वाजता पार्थिव मुख्यालयात आणून मानवंदना देण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार विकास महात्मे, आमदार संजय धोटे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि कुटुंबीयांची उपस्थिती होती. चिडे यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि आरोपींना पकडून कठोर शिक्षा केली जाईल. सोबतच चिडे यांना शहीदाचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याचं यावेळी अहीर यांनी सांगितलं.

चिडे यांच्या हत्येनं अनेक प्रश्न उपस्थित केले असून, ते पोलीस विभागाला अंतर्मुख करणारे आहेत. तीन वर्षांपूर्वी झालेल्या दारुबंदीचं यश दिसण्याऐवजी अपयशच अधिक दिसून आलं. गेल्या तीन वर्षांत ५५ कोटींची दारू पकडण्यात आली. न पकडलेली दारु वेगळीच. तर २३ हजार गुन्हे दाखल झाले. ही कारवाई कागदावर दिसत असली, तरी पोलिसांच्याच आशीर्वादानं जिल्ह्यात दारुचा महापूर वाहतो. कालचे गावगुंड आज मोठमोठ्या महागड्या कारमधून फिरत आहेत. पोलिसांचा आशीर्वाद असल्यानं त्यांची हिंमत वाढली. चिडे यांची हत्या याच दादागिरीतून झाली आहे. आता पोलिसांवर अशाप्रकारचे हल्ले रोखण्यासाठी स्वरक्षणासाठी शस्त्र चालवण्याची परवानगी देण्यात आली.

या घटनेच्या निमित्तानं चंद्रपुरातील फसलेल्या दारुबंदीवर बोट ठेवण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. दारुबंदीनंतर अतिरिक्त पोलीस देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, अजूनही ती पूर्ण झालेली नाही. यासाठी दारुबंदीच्या प्रणेत्यांना धारेवर धरलं जात आहे.