शहीद नितीन राठोड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सामना प्रतिनिधी । लोणार 

पुलवामा येथील आतंकवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त झालेल्या लोणार तालुक्यातील चोरपांग्रा (गोवर्धन नगर तांडा) येथील नितीन राठोड यांचे पार्थिव शरीर तिरंग्यात लपेटून यांच्या जन्मगावी आणल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुलवामा येथील अवंतीपुरा याठिकाणी जैश ए मोहम्मद या आतंकवादी संघटनेने जवळपास ३५० किलो आरडीएक्सने भरलेल्या खाजगी गाडीने सुट्टीवरुन परतल्यानंतर कर्तव्यावर जाणार्‍या जवळपास ७८ वाहनांमधून जाणार्‍या २५०० सैनिकांच्या वाहनांना जाऊन धडकली. यामुळे घडलेल्या अपघातात एका वाहनातील ४४ जवानांना वीरमरण प्राप्त झाले. हा आत्मघातकी हल्ला एवढा प्रचंड होता की जवानांचे मृतदेहाचे अवशेष पार विखुरलेल्या अवस्थेत दिसून येत होते. या हल्ल्यात नुकतीच आपली सुट्टी संपवून जम्मू काश्मीरकडे कर्तव्य बजावण्याकरिता निघालेले बटालियन ३ रेजिमेंटचे सैनिक चोरपांग्रा येथील नितीन राठोड सुद्धा शहीद झाले.

नितीन शिवाजी राठोड हे हल्ल्यात शहीद झाल्याचे कळताच त्यांच्या कुटूंबासह गावावर शोककळा पसरली. प्रथम या घटनेवर विश्वासच बसत नव्हता. परंतु घटनेची सत्यता प्रशासनाकडून कळाल्यानंतर शहीद नितीन राठोड यांचे वडील शिवाजी राठोड, आई सावित्रीबाई राठोड, पत्नी वंदना राठोड, भाऊ प्रविण राठोड, बहिणी गीता व योगिता सह ८ वर्षाचा मुलगा जीवन आणि ४ वर्षाची जिविका यांच्यावर जणू काही आभाळच कोळसले.

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या वीरपुत्राचे पार्थिव आज तिरंग्यात लपेटून शवपेटीतून घरी येणार असल्याचे कळताच नितीच्या आईची प्रकृती अतिशय गंभीर झाली. आज सकाळपासूनच शहीद नितीन राठोड यांना निरोप देण्यासाठी बुलढाणा जिल्हाभरातून तसेच लोणार, मेहकर, सिंदखेडराजा व जवळपासच्या पंचक्रोशीतून लाखोंचा जनसागर चोरपांग्रा येथे उसळला होता. यावेळी जवळपास ३ वाजता सैन्यदलाच्या वाहनातून शहीद नितीन राठोडचे पार्थिव आणल्या गेले. त्यांचे पार्थिव दर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आले होते. दरम्यान पार्थिव पाहताच नितीन राठोडच्या कुटूंबियांनी धीर सोडला. नितीन राठोड यांच्या पत्नीने, आईन, वडिलांनी आपल्या लाडक्या नितीनचे पार्थिव पाहताच भारतीय सैन्य दलाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना असा भ्याड हल्ला करणार्‍या पाकिस्तानचा खात्मा करा साहेब आणि आमच्या नितीनला न्याय द्या अशी मागणी केली.

यावेळी उपस्थित लाखोंच्या जनसमुदायातून ‘‘पाकिस्तान मुर्दाबाद, शहीद नितीन राठोड अमर रहे’’ सारख्या घोषणा दिल्याने वातावरण खूपच भावूक झाले होते. घरापासून जवळपास अर्धा कि.मी.वर मोकळ्या मैदानावर शहीद नितीन राठोड यांच्या अंत्यविधीची संपूर्ण तयारी तहसीलदार सुरेश कव्हळे व प्रशासनाने पुर्ण केली होती. राज्य शासनाच्या वतीने माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी निलंगेकर पाटील सह जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील प्रशासकीय अधिकारी यांनी शहीदाला श्रद्धांजली दिली व आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. यावेळी लोणार पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र माळी यांच्या नेतृत्वात पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

चार दिवसाआधीच आपली सुट्टी संपवून गेलेले शहीद नितीन राठोड अशा स्वरुपात परत येतील याची कल्पनाही त्यांच्या कुटूंबीयांनी केली नव्हती. शहीदाचे पार्थिव जेव्हा त्यांच्या आईने बघितले आणि घरातील वातावरण गंभीर झाले. त्यांच्या आईची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना सलाईन सुरु होती. त्यांच्यावर डॉक्टरांकडून सातत्याने उपचार सुरु होते.