बायकोचे पाय चेपावे लागत असल्याने ऑफिसला उशीर होतो

सामना ऑनलाईन । चित्रकूट

ऑफिसला उशिरा पोहोचण्याची अनेक कर्मचारी वेगवेगळी कारणे देताना आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र उत्तर प्रदेशातल्या चित्रकूट जिल्ह्यात एका सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांना दिलेले लेखी कारण ऐकाल तर तुम्हीही चाट पडाल. या महाशयांनी ऑफिसला उशिरा येण्याचं कारण सांगितलं की, त्याला रोज बायकोचे पाय दाबावे लागतात, इतकंच नाही, तर घरातील सर्व कामंही त्यालाच करावी लागतात.

चित्रकूटमधील सरकारी कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असलेले अशोक कुमार 18 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणेच उशिरा आले. त्यामुळे त्यांचे वरिष्ठ अधिकारी उपायुक्त एम.एस. वर्मा यांनी ऑफिसला यायची वेळ ही 10.15 वाजताची असताना तुम्ही इतक्या उशिरा का आलात असा प्रश्न विचारला. वर्मा यांनी या कर्मचाऱ्याला ऑफिस संपायच्या आत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले.

आता कारवाई अटळ आहे हे कळल्यावर अशोक कुमार यांनी लेखी उत्तर दिले. मात्र त्यांचे उत्तर वाचल्यावर वरिष्ठांना देखील काय बोलावं हे कळेनासे झाले. “पत्नीची तब्बेत बरी नसल्यामुळे तिचे पाय दाबावे लागतात, स्वयंपाकापासून घरातील सर्व कामं आपल्यालाच करावी अगतात, त्यामुळे ही सर्व कसरत करुन मग ऑफीसला यावे लागते त्यामुळे उशीर होतो” असं अशोक कुमार यांनी वरिष्ठांना दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलंय. अशोक कुमार यांची अगतिकता लक्षात घेऊन वरिष्ठांनी माणूसकीच्या दृष्टिकोनातून कारवाई थांबवली.