पृथ्वीच्या विनाशाची भाकिते

[email protected]

कोणाला कसले ‘साक्षात्कार’ कधी होतील सांगता येत नाही. एका अमेरिकन लेखकाने त्याच्या ‘अंकशास्त्रा’वरून भाकीत केले की आता पृथ्वीचा अंत ओढवणार! नेमका कधी तेही त्याने सांगितले. २३ सप्टेंबर २०१७. ही पृथ्वीच्या मृत्यूची तारीखच त्याने जाहीर केली…. आणि २ ऑक्टोबर २०१७ रोजी हा लेख लिहीत असताना मला खिडकीबाहेर हिरवीगार धरित्री आणि वर निळेशार आकाश दिसतेय. पशु-पक्षी आणि माणसांसह सर्वांचे व्यवहार सुखेनैव चालले आहेत. मग या पृथ्वीच्या विनाशाच्या भाकिताचे काय?

अशी भाकड भाकिते आजवर सुमारे दीडशे वेळा जाहीर झाली आहेत. मला आठवते ते १९६०च्या दशकातले ‘पृथ्वीचा नाश’ होण्याचे भाकीत. काही ग्रह सूर्याच्या एका बाजूला येणार आणि मग पृथ्वीचे काही खरे नाही असे छातीठोकपणे सांगणारे भंपकवीर तेव्हाही होतेच. काहीच झाले नाही नि त्याचेही भाकीत करणाऱ्यांना काही वाटले नाही. उलट कोणत्या कारणांमुळे पृथिव्यान्त झाला नाही या गोष्टी तेच सांगू लागले.

१९६८ मध्ये ‘इकॅरस’ की अशाच काहीतरी नावाचा एक महापाषाण (अशनी) पृथ्वीवर आदळणार अशा अफवा पसरल्या. तेव्हा टीव्ही नव्हता, पण वृत्तपत्रातून आणि चौकाचौकात चर्चासत्रे सुरू झाली. ‘विनाशाचा’ दिवस नेहमीसारखाच उगवला आणि मावळला. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवलेला पाहताच लोकांच्या मनातली धास्तीही विरून गेली. यावेळी चॅनेल, ब्रेकिंग न्यूज असे प्रकार असल्याने २३ सप्टेंबरबाबतची चॅनली-चर्चा बरीच रंगली. त्यात शास्त्रज्ञांनी हे सारे थोतांड असल्याचे स्पष्ट केलेच. तरी कुणीतरी दबक्या आवाजात विचारत राहिले. खरेच काही होणार नाही ना?’ अशा शंकासुरांना थेट आणि ठामपणे ‘नाही’ असे उत्तर द्यावे. मुळात प्रश्न होता अवघ्या पृथ्वीवरच्या जीवसृष्टीच्या नाशाचा. तो झाला असता तर प्रश्नकर्त्यांसकट कोणीच उरणार नव्हते. पण ‘असे अजिबात घडणार नाही. मुळीच घाबरू नका’ असा दिलासा देणारे दुसऱ्या दिवशी जिंकले. त्यांचे म्हणणे सिद्ध झाले. प्रत्येक अफवेच्या वेळी हे असेच होणार.

एखादा ग्रह अचानक पृथ्वीवर येऊन आदळणे म्हणजे काय कथा, कादंबरी, फिल्ममधली गंमत आहे. मुळात असा एखादा ग्रह सूर्यमालेच्या दूरच्या टोकाला असला तरी आता त्याचा पत्ता आपल्याला लागतो. पृथ्वी आणि इतरही ग्रहांच्या निर्वात पोकळीत भरकटणाऱ्या महापाषाण किंवा लघुग्रहांची नोंद ‘नासा’सारख्या संस्थांकडे असते. अवकाशात भिरभिरणाऱ्या ‘हबल दुर्बिण’ या माणसाच्या अंतराळातील डोळ्याला पृथ्वीजवळ येणारा महापाषाणांचा नक्कीच पत्ता लागू शकतो. त्यांची गती, वजन आणि ते पृथ्वीच्या किती जवळून जाणार याचीही माहिती आता मिळू शकते. पृथ्वीला कधीकाळी धोकादायक ठरू शकतील अशा ‘निअर अर्थ ऑब्जेक्टस्’ची यादीही वैज्ञानिकांकडे आहे. आजपर्यंत वैज्ञानिक पद्धतीने, पृथ्वीच्या जवळून जाणारे म्हणून नोंदल्या गेलेल्या अशनींनीही पृथ्वीला उपकारक हुलकावणी दिलेली आहे.

६५ कोटी वर्षांपूर्वी एक महापाषाण पृथ्वीवर कोसळल्याने डायनोसॉर नष्ट झाले अशी एक विचारधारा आहे. इतका मोठा उत्पात होऊनही तेव्हा पृथ्वी नष्ट झाली नाही हे लक्षात घ्या. १२८०० कि.मी. व्यासाच्या आपल्या पाणी आणि सजीव सृष्टीने बहरलेल्या प्रचंड ग्रहाची मोडतोड होणे कठीण आहे. सुनामी किंवा महाचक्रीवादळासारखे उत्पात होतील. पण ते आपल्या ग्रहापुरतेच असतील. चार कोटी वर्षांपूर्वी जन्मलेली पृथ्वी नष्ट होण्याएवढी लेचीपेची नाही.

….मात्र वाढते प्रदूषण आणि विनाशकारी शस्त्रास्त्रांनी माणूस नावाचा प्राणी आगामी काळात (सुज्ञ न बनल्यास) एकूणच पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा मात्र आत्मघाती घास घेऊ शकतो. खरोखरच डोळे उघडून पृथ्वीच्या प्रदूषित आजारपणाकडे तातडीने लक्ष द्यायला हवे अन्यथा अवकाशातून एखादी आपत्ती येण्यापूर्वीच माणूस आत्मनाश करून घेईल. दचकायला हवे ते पर्यावरण ऱ्हासाच्या परिणामांमुळे. उगाच एका क्षणी पृथ्वीचा अंत ओढवेल अशा भुक्कड भाकितांना भीक घालण्याचे कारण नाही.