पृथ्वीचे भवितव्य

khagoldilip@gmail.com

पृथ्वीवरची माणसं त्यांना ‘भांडण’ कळायला लागल्यापासून सतत भांडतायत. दगडी हत्यारांपासून ते ऍटम बॉम्बपर्यंत ‘प्रगती’ करून केवळ माणसाच्याच नव्हे तर एकूणच पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अंत घडविण्याची ‘क्षमता’ बुद्धिमान म्हणवणाऱया माणसाने आत्मसात केली आहे. विद्वेषाचा उद्रेक कधी, कुठे, कसा होईल आणि त्याची परिणिती नेमक्या किती विध्वंसात होतील याची कल्पना माणसाला नाही, पण तसं होऊ शकतं याची जाणीव आहे. म्हणूनच सुज्ञ माणसं जग वाचवण्याचा आक्रोश करताना दिसतात, पण त्यांचे ऐकतो कोण!

त्यातच भरीला भर म्हणून पृथ्वीवरच्या वातावरणात वेगाने बदल होताना जाणवतायत. अवकाळी पाऊस, गारपिटीचं थैमान तर कधी अतिशीत किंवा अति उष्णतेची लाट याचा अनुभव थोडय़ाफार प्रमाणात आपणही घेत आहोत. या साऱया अस्मानी आणि देशोदेशींच्या सुलतानी संकटांपुढे माणसाचा किती टिकाव लागेल? कल्पना नाही.

मानवनिर्मित संहारक अस्त्र्ाांचा विचार बाजूला ठेवला तरी स्टीफन हॉकिंगसारख्या विख्यात खगोल शास्त्रज्ञांना पृथ्वीवरच्या बदलत्या हवामानात माणूस तग धरेल का याविषयी शंका वाटते. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार हॉकिंग यांनी माणसाला पुढच्या शंभर वर्षांत पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामुळे पृथ्वीबाहेर वसाहतयोग्य जागा शोधावी लागेल असं म्हटलंय. ‘बीबीसी’च्या ‘उद्याचे जग’ या मालिकेत त्यांचं हे म्हणणं मांडलं गेलंय.

एका बाजूला पृथ्वी वसाहतयोग्य राहणार नाही असं म्हटलं जात असतानाच खगोल वैज्ञानिक चंद्रावर वसाहत करण्याच्या प्रयत्नात आहेत. अगदी लवकर म्हणजे २०२० पर्यंत एखादं ‘खेडं’ चंद्रावर निर्माण करण्याच्या स्पर्धेत युरोपीय देशांसह चीनही पुढे सरसावला आहे. चीनचं ‘चॅन्ग-५’ हे यान या वर्षाच्या अखेरीस चंद्राच्या आपल्याला न दिसणाऱ्या भागात उतरेल आणि तिथल्या दगड-मातीचे नमुने गोळा करून चंद्रावर वस्ती कशी करता येईल याचा विचार करेल.

‘युरोपीय स्पेस एजन्सी’ या २२ देशांच्या संस्थेनेही चंद्राच्या वस्तीसाठी चाचपणी सुरू केली आहे. १९६९ ते ७२ या काळात अमेरिकेचे अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले. १९७२ मध्ये अपोलो – १७ च्या यशानंतर माणूस चंद्रावर गेलेला नाही. यापुढे केवळ प्रायोगिक पातळीवर चंद्रयात्रा करण्याऐवजी तेथे कायम वसाहतीच्या दृष्टीने काय करता येईल याचा विचार प्रगत राष्ट्रातील खगोलविज्ञान संस्था करीत आहेत. ‘युरोपीयन स्पेस एजन्सी’च्या संशोधकांच्या मते चंद्रावरच्या मातीमधून तिथे घरं बांधण्यासाठी विटा तयार करता येतील. पौर्णिमेचा चंद्र सूर्याच्या परावर्तीत प्रकाशामुळे कितीही सुंदर दिसत असला तरी चांद्रपृष्ठावरची माती कोळशासारखी काळी कुळकुळीत आहे. अहमदाबादच्या ‘पीआरएल’मध्ये ती पाहिल्याचं आठवतं. अशा मातीपासून तेथेच सोलार भट्टीत या विटा भाजता येतील हे ‘ईएसए’ने तशाच प्रकारचं वातावरण पृथ्वीवर तयार करून (सिम्युलेशनद्वारा) असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामध्ये थ्री-डी प्रिंटिंगचा वापर करण्यात आला आहे. पृथ्वीचा ‘त्याग’ माणसाला काही कारणाने करावा लागला तर विश्वातील एका अप्रतिम ग्रहाशी होणारा तो वियोग असेल. अजून तरी तशी वेळ आलेली नाही, पण पुढच्या पिढय़ांच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय कोणास ठाऊक!