अकरावी ऑनलाइन प्रवेश, नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश फुल्ल

सामना प्रतिनिधी, मुंबई

अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीनंतर मुंबईतील नामांकित कॉलेजांतील अकरावीच्या बहुतांश जागा फुल्ल झाल्या आहेत. काही कॉलेजमध्ये तर सायन्स आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्याच जागा शिल्लक आहेत. त्यामुळे सोमवारी जाहीर होणाऱ्या दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतर नामांकित कॉलेजमधील प्रवेश फुल्ल होणार असून या कॉलेजांसाठी दुसरी यादीच शेवटची ठरणार आहे.

अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील मुंबई विभागातून एक लाख २० हजार ५६६ पात्र विद्यार्थांपैकी ५० हजार ६२९ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. यामुळे दुसऱया फेरीसाठी ऑनलाइनसाठी समर्पित जागा, इनहाऊस, अल्पसंख्याक आणि मॅनेजमेंट कोटय़ासह एकूण २ लाख १२ हजार ५९३ जागा शिल्लक आहेत. तर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्ज केलेल्या दोन लाख तीन हजार १२० विद्यार्थ्यांपैकी आता दुसऱया फेरीसाठी एक लाख ५२ हजार १९४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. उपलब्ध जागांपेक्षा विद्यार्थी संख्या कमी असली तरी बरेच विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. कारण विद्यार्थ्यांचा ओढा हा नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याकडेच असतो.

दुसऱया यादीनंतर अकरावीचे वर्ग सुरू
अकरावीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काही कॉलेजमध्ये अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. या कॉलेजमध्ये तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार नाही. कारण दुसऱ्या यादीतच अकरावीच्या जागा पूर्ण भरणार आहेत. कॉलेजमधील ७५ टक्के प्रवेश पूर्ण झाल्यास वर्ग सुरू करावेत, अशा सूचना यापूर्वीच शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिल्याने जागा भरलेल्या काही कॉलेजमध्ये अकरावीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या गुणवत्ता यादीत नाव येऊनही प्रवेश घेतला नाही त्यांना तिसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळणार आहे.

दुसऱया यादीसाठी नामांकित कॉलेजमधील उपलब्ध जागा
आंबेडकर – ऑटोमोबाईल ३,
इलेक्ट्रॉनिक्स – टेलिकम्युनिकेशन ३, टुरिझम ९
झुनझुनवाला – सायन्स ९
वझे-केळकर – आर्टस् १२, कॉमर्स १५, सायन्स १४
मुलुंड कॉलेज – कॉमर्स १६
स्वामी विवेकानंद – सायन्स ५
रिझवी – इलेक्ट्रॉनिक्स ३

मॅडमिशन
दुसरी गुणवत्ता यादी १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. यादीनुसार प्रवेशपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी १६ ते १८ जुलै या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे बंधनकारक आहे.

शिलकीतील जागा
रूपारेल – सायन्स ३८, इलेक्ट्रॉनिक्स १, इलेक्ट्रॉनिक्स-टेलिकम्युनिकेशन २
सोमय्या – अकाऊंटिंग ७
रुईया – आर्टस् (इंग्रजी) १८, आर्टस् (मराठी)१, सायन्स १८
पोदार – कॉमर्स १०
झेवियर्स – आर्टस् ८, सायन्स ४८