नितिन गडकरी आणि संघानेच रचला मोदींच्या हत्येचा ‘कट’

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट नक्षलवाद्यांनी रचल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. यानंतर जेएनयू विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्षा शेहला रशीद हिने मोदी यांच्या हत्येचा कट ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी रचला, असं ट्वीट केल्याने खळबळ उडाली आहे. शेहला हिच्या या ट्वीटवर गडकरी यांनी आक्षेप घेतला असून शेहलावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी शुक्रवारी पुणे पोलिसांनी ५ जणांना न्यायालयात हजर केले होते. यातील एकजण दिल्लीतला असून त्याच्याजवळ मोदींच्या हत्येचा कट रचल्याचा पुरावा मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. पोलिसांनी दिलेल्या या माहितीनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पण आता शेहला हिने भाजप सरकारलाच लक्ष्य करत मोदींच्या हत्येचा कट ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी रचल्याच ट्वीट केलं. तसेच या हत्येचा कट मुस्लीम व कम्युनिस्टांवर करतील आणि मुस्लिमांची हत्या घडवून आणतील, असा गंभीर आरोपही तिने ट्वीटमध्ये केला.

शेहलाच्या ट्वीटवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आक्षेप घेतला आहे. तिच्या ट्वीटला उत्तर देताना गडकरी यांनी अशा समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला. त्यानंतर शेहलाने लगेचच यूटर्न घेत आपण ते ट्वीट उपहासाने केल्याचं म्हटलं. तसेच ‘जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या नेत्याला मस्करीत केलेल्या एका ट्वीटवर इतका राग येतो. मग उमर खालिदसारख्या निष्पाप विद्यार्थ्यांविरोधात टाईम्स नाऊला हाताशी धरून मोहीम चालवलीत, त्यावेळी त्याच्या आई-वडिलांना काय वाटलं असेल याचा विचार करा, असं दुसरं ट्वीट शेहला केलं आहे.