गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीहून शेगावात परतली

राजेश देशमाने । शेगाव

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून श्री संत गजानन महाराजांची पालखी शुक्रवारी विदर्भातल्या पंढरीत दाखल झाली. हजारो भाविकांनी श्रींच्या पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करून दर्शन घेतले. हजारो भक्त पालखीसोबत खामगाव ते शेगाव पायी चालत आले. यावेळी खामगाव ते शेगाव मार्ग भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता.

श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे ५१ वे वर्ष आहे. खामगाव मुक्काम आटोपून शुक्रवारी सकाळी ७ वाजता पालखीने प्रस्थान करून ११ वाजता संतनगरीत दाखल झाली. संस्थानाचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन करून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी विश्वस्त निळकंठदादा पाटील, नारायणकाका पाटील, गोविंदराव कलोरे, श्रीकांतदादा पाटील, श्री.ग.म.अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर दर्शनासाठी संतनगरी विकांच्या गर्दीने फुलली होती.

दरम्यान, पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.