मातीतले खेळ…मलखांब

बाळ तोरसकर

मलखांब हा कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागास जास्तीत जास्त व्यायाम देणारा क्रीडाप्रकार आहे. या खेळाचा प्रत्येक खेळासाठी पायाभूत खेळ म्हणूनसुद्धा उपयोग केला जाऊ शकतो.

संतुलित व नियमित व्यायामाने नेहमी होणारे सर्दी, ताप यांसारखे आजारसुद्धा आपल्यापासून दूर राहतात. यासाठी वेगवेगळे व्यायाम प्रकार आपण नियमित जोपासणे गरजेचे आहे. त्यासाठी आज आपण मलखांब या खेळाची ओळख करून घेऊया.

रामायण-महाभारत काळापासून चालत आलेल्या कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मलखांब हा खेळ पुढे आला. सोमेश्वर चालुक्य यांनी १२ व्या शतकात लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ या ग्रंथात मलखांबसदृश प्रकारांचा उल्लेख आढळतो. दोनशे वर्षांपूर्वी दुसऱया बाजीराव पेशव्यांच्या दरबारात बाळंभट्टदादा देवधर यांनी आपले कसब दाखवले. खरे तर बाळंभट्टदादा देवधर हे पेशव्यांच्या दरबारात भिक्षुक म्हणून राहत होते. पूजाअर्चा करणे हे त्यांचे प्रमुख कार्य. त्यावेळी पेशव्यांच्या दरबारी बावन्न सनदी पैलवान होते. हैदराबादच्या निजामाकडून आलेल्या अली व गुलाब नावाच्या या दोन भीमकाय, बलदंड व धिप्पाड पैलवानांनी या बावन्न पैलवानांना जाहीर आव्हान दिले. त्यावेळी बाळंभट्टदादा देवधर यांनी बाजीराव पेशव्यांच्या परवानगीने हे आव्हान स्वीकारले. त्यानंतर ठरलेल्या वेळी पुण्याच्या अफाट जनसमुदायासमोर सुरू झालेल्या कुस्तीत भीमकाय, बलदंड असलेल्या अलीला अनेक झटापटी व वेगवेगळ्या डावपेचांनंतर ‘गळेखोडा’च्या डावाने चीतपट करताना अलीला अस्मान दाखवले. अलीची दशा पाहून गुलाबने कुस्ती न खेळताच पराभव मान्य केला. त्यामुळे देशभर उत्तम कुस्तीगीर म्हणून बाळंभट्टदादांचा नावलौकिक झाला.

मलखांब हा कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागास जास्तीत जास्त व्यायाम देणारा क्रीडाप्रकार आहे. मलखांब एकाग्रता, आत्मविश्वास, समन्वय, धैर्य, नियंत्रण, मूल्य परिणामकारकता, सृजनशीलता व संस्कृती वाढवण्यास उपयोगी ठरू शकतो. पूर्वी प्रत्येक आखाडय़ातील कुस्तीगीर हा मलखांबावर सराव करत असत व प्रत्येक मलखांबपट्टू हा कुस्ती खेळत असे. बाळंभट्टदादांचे पट्टशिष्य कोंडभटनाना गोडबोले यांनी तयार केलेल्या व वेत मलखांबाचे गुरुवर्य दामोदरभट रामकृष्ण मोघे (अच्युतानंद स्वामी महाराज) हे रोज मल्लखांबावर अठराशे साध्या उडय़ा मारीत असत, तर रोज सकाळी व संध्याकाळी तीन-तीन तास कुस्तीचाही सराव करीत असत. बाळंभट्टदादांच्या अनेक शिष्यांपैकी एक असलेले पैलवान टक्के जमाल हे तर शरीरावर ४० ते ५० हत्यारे बांधून मल्लखांबावर वेगवेगळ्या कसरती करत असत. इतकेच नव्हे तर ते डोक्याला पागोटे बांधून व एका हातात पिस्तूल घेऊन सुद्धा मलखांबावर कसरत करीत थेट बोंडावर जात व तिथून नेमबाजीचे काम करत. तसेच पुण्याचे कै. प. वि. बाणे गुरुजी दोरी मलखांबावर विविध उलटय़ा-सुलटय़ा अढय़ा लावून लाकडी तक्त्यावर अचूक सुराफेक करत असत.

मलखांब या अस्सल हिंदुस्थानी खेळाचा फार पूर्वीपासून वेगवेगळ्या निमित्ताने परदेश प्रवासही झाला आहे. गेल्या शतकात मलखांबाने परदेशीही भरपूर लोकप्रियता मिळवली. १९३६ मध्ये झालेल्या बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळी मुंबईच्या बॉम्बे

जिम्नॅस्टिक्स इन्स्टिटय़ूटच्या कै. डॉ. डी. एम. कल्याणपूरकर आणि त्यांचे दोन पट्टशिष्य कै. दत्ताराम ना. लाड व कै. गोविंद ल. नर्डेकर यांनी अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षक, खेळाडू व पदाधिकाऱयांच्या समोर मलखांब व चिमणी मलखांबची अप्रतिम प्रात्यक्षिके सादर केली. त्यावेळी उपस्थित प्रेक्षकांबरोबर प्रत्यक्ष हिटलर यांनीही मलखांबाचे कौतुक केल्याचे सांगितले जाते. अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने आंतरराष्ट्रीय युवक मेळावा, आंतरराष्ट्रीय महिला परिषद, आंतरराष्ट्रीय बाल महोत्सव आदी निमित्ताने मल्लखांबाला इराण, फिनलंड, इंग्लंड, फ्रान्स, स्टॉकहोम, अमेरिका आदी देशांमध्ये पोहोचवले. १९८७ मध्ये हिंदुस्थान सरकारने ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया इन यूएसएसआर’च्या अंतर्गत कबड्डी, खो-खो, आटय़ापाटय़ा, मलखांब आदी देशी खेळांची प्रदर्शन पथके रशियामध्ये पाठवून त्यांची प्रात्यक्षिके सादर केली. त्यावेळी तेथील एका स्थानिक वर्तमानपत्राने तर असे म्हटले होते की, ‘तीन हिंदुस्थानी गोष्टींनी रशियन लोकांना वेड लावले आहे. एक जवाहरलाल नेहरू, दोन राज कपूर व तिसरी म्हणजे मल्लखांब!’