राजेशाही सजावट

बाप्पाची सजावट अनेक गोष्टींनी होते. फळांनी, फुलांनी, बाजारात मिळणाऱ्या मखरांनी. पण आपल्याच देखण्या भरजरी साड्या यासाठी वापरल्या तर…

बाप्पा हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय… त्याच्या आगमनाने चैतन्याचे वातावरण निर्माण होते. बाप्पाची मूर्ती सुंदर आणि आकर्षक दिसण्याचा साऱ्यांचाच अट्टहास असतो. त्याचप्रमाणे त्याची सजावटही वेगळी दिसावी यासाठी सगळेच मेहनत घेत असतात. बऱ्याचदा नेमकी सजावट काय करायची ते लक्षात येत नाही. पण आपल्या घरीच अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्या मदतीने बाप्पाची सजावट आणखी सुंदर प्रकारे करता येते.

कपड्याची फुले
पांढरी साडी किंवा पांढरा दुपट्टा घेऊन त्याला डोंगरासारखा आकार द्यायचा. त्यावर थोडी चमकी वापरायची. त्यामुळे ते आणखी आकर्षक वाटेल. नाहीतर फॅब्रिकच्या कपड्याची फुले बनवू शकाल. त्या फुलांचा छान वापर करता येईल. हव्या त्या पद्धतीने ती सजवू शकता.

रंग निवडताना
सजावटीसाठी आपण ज्या साड्या वापरतो त्याचे रंगही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यासाठी रंगही निवडून वापरायला हवेत. कारण कलर थीमही सजावटीचा मुख्य गाभा आहे. जितके आकर्षक रंग निवडाल तितकी मूर्ती छान वाटेल. समजा हॉलला किंवा जिथे गणपती बसवतो त्या जागेला गडद रंग असेल तर लाईट रंगाच्या साड्या वापरायच्या आणि लाईट रंगाच्या हॉलमध्ये गडद रंगाच्या साड्या वापरायच्या… कॉन्ट्रास्ट. त्याने सजावट उठून दिसेल. रंगांचे कॉम्बिनेशन छान वाटायला हवे. विशेषतः हॉलला लाईट रंग असतात. त्यामुळे साड्या निवडताना गडद रंगाच्या निवडलेल्या बऱ्या, तो इफेक्ट थोडासा चांगला वाटतो.

मोती, मोरपीसचा वापर
वेगवेगळे दुपट्टे घ्यायचे आणि त्याच्या उभ्या पट्ट्या कापायच्या. त्यानेही सजावट चांगली दिसते. असे आठ-दहा दुपट्टे एकत्र करून लावायचे. ते छान वाटतात. मोठमोठे मोती बाजारात सहज मिळतात. त्या मोत्यांची माळ करुन तेही सगळ्या घरात लावता येतील. मोरांच्या पिसांचाही सजावटीसाठी उपयोग करता येईल. या पिसांचा हवा तसा वापर करू शकता. या गोष्टी कलात्मक तर आहेतच, पण घरच्या घरी असल्यामुळे त्या सहज उपलब्धही होऊ शकतात. शिवाय या सजावटीसाठी खर्चही कमी येतो.

निऱ्यांचा पडदा
आपल्या नेहमीच्या साड्यांमध्ये व्हरायटी कशी आणता येईल हे बघूया. घरी जरीच्या साड्या असतील किंवा रॉ सिल्कच्या साड्या असतील. तर त्या घ्यायच्या आणि त्या साडीच्या समान निऱ्या करायच्या. त्याला दुसरी साडी जोडून त्या मोठ्या पडद्यासारख्या पाठीमागे लावायच्या. त्याचा पडद्यासारखा उपयोग होतो. प्लेन साडी लावल्यावर त्याला काही मजा राहत नाही. पण त्यालाच थोड्या निऱ्या पाडल्या की त्याला एक वेगळा लुक येतो.

बाप्पाचे टेबल
बऱ्याचदा बाप्पाची मूर्ती लाकडाच्या बाकावर ठेवली जाते. हा बाकही आकर्षक बनवायचा तर अशाचप्रकारे साड्यांच्या निऱ्या करून ते पूर्ण टेबलला लावायच्या. म्हणजे टेबल आकर्षक दिसेल. गणपतीजवळील साईड टेबलही अशाप्रकारे सजवल्यास छान वाटेल. साडीच्या छान प्लेट्स पाडून खाली सोडायच्या.

तंबूच्या आकारात…
साड्यांमध्ये दुसरे पॅटर्न म्हणजे शिफॉन. सजावटीसाठी शिफॉनचे फॅब्रिक, साडी किंवा दुपट्टा वापरू शकतो. गणेशाची मूर्ती बसवतो तिथे तंबूसारख्या आकार घेऊन त्या साडय़ा किंवा दुपट्टा लावायचा. वेगवेगळ्या रंगाच्या साडय़ा किंवा दुपट्टे तंबूच्या आकारात सोडायचे. ते पाहायला खूप छान आणि वेगळे वाटते. एवढेच नाही तर त्यावर छान लाईट्सची माळ सोडली की तो इफेक्ट खूप मस्त आणि सोबर वाटतो.

वेगळे कपडे आणून
काहीवेळा बाप्पाच्या डेकोरेशनसाठी जुन्या वस्तू वापरणं रुचत नाही. अशावेळी बाजारात मिळणारे फॅब्रिकही वापरता येईल. जॉर्जेटचे प्लेन कापड मिळते. तेही सजावटीसाठी चालेल. हॉल मोठा असेल तर एकाच रंगाचे कापड आणून छानसा त्याला तोरणासारखा आकार देऊन सगळ्या हॉलला लावायचा. त्याने हॉल डेकोरेट करु शकतो. त्यावर लाईट सोडला तर आणखी छान वाटतं. – पूजा पोवार, फॅशन डिझायनर