मध्य प्रदेशात दोन हजाराच्या नोटेवरुन बापू गायब

सामना ऑनलाईन। मध्य प्रदेश
मध्य प्रदेशमधील श्योपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून काढलेल्या पैशांमध्ये २००० रुपयांच्या काही नोटांवरुन महात्मा गांधी यांचे छायाचित्र गायब असल्याचे समोर आले आहे.  दरम्यान ही बनावट नोट नसून प्रिटींग मिस्टेक असल्याचे बँकेने म्हटले आहे. विशेष म्हणजे नोटेवरुन बापूंचे छायाचित्र गायब होण्याची ही या वर्षातली तिसरी घटना आहे.
पुरुषोत्तम नागर हा शेतकरी शनिवारी पैसे काढण्यासाठी शिवपुरी येथील  स्टेट बँके ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये गेला होता. त्याने एटीएम मधून चारवेळा दहा हजार असे चाळीस हजार रुपये काढले. पैसे मोजत असताना त्यातील २००० रुपयांच्या काही नोटांवर बापूंचे छायाचित्रच नसल्याचे त्याच्या लक्षात आले. या बनावट नोटा असल्याचा त्याला संशय आल्याने त्याने तडक बँक गाठली. बँकेच्या मॅनेजरने नोटेची शहानिशा करुन ती बनावट नसून प्रिटींग मिस्टेक असल्याचे नागर यांना सांगितले. तसेच त्या नोटांच्या बदल्यात त्यांना दुसऱ्या नोटा दिल्या.
मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने दोन हजार रुपये काढले होते. त्यावेळी पाचशे रुपयांच्या दोन नोटा एका बाजूने कोऱ्या होत्या. तर दुसऱ्या घटनेत मध्य प्रदेशमधीलच स्टेट बँक ऑफ इंडियाच्याच एटीएम मधून एकाने १५०० रुपये काढले होते. त्यालाही पाचशे रुपयाच्या नोटा एका बाजूने कोऱ्या असलेल्या मिळाल्या होत्या.
विरोधकांनी मात्र यामुद्द्यावरून सरकारवर टीका केली असून ही ‘प्रिंटिंग मिस्टेक’ आहे की महात्मा गांधी यांना हटवण्याचा भाजपचा अजेंडा? असा सवाल केला आहे.