शाही मिरवणुकांनी गणरायाचे जल्लोषात आगमन

167

सामना प्रतिनिधी । पुणे

ढोल-ताशांचा निनाद, झांजांचा खणखणाट, सनईचे मंगल सूर, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’चा अखंड जयघोष अशा उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात शाही मिरवणुकांनी लाडक्या गणरायाचे आगमन झाले.

मानाच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट या पुण्याच्या गणेशोत्सवाचे आकर्षण असलेल्या मंडळांच्या श्री गणरायाची मध्यान्हापूर्वीच प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पुण्यनगरीचे ग्रामदैवत मानाचा पहिला, श्री कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते झाली. त्यापूर्वी उत्सव मंडपापासून मिरवणूक निघाली. देवळाणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, श्रीराम, आवर्तन ढोल-ताशा पथक आणि अग्रभागी असलेल्या प्रभात बँड पथकाने मिरवणुकीत रंगत आणली. हमालवाडा, कुंटे चौक, वैभव चौक, अप्पा बळवंत चौक, फरासखाना, लालमहाल चौक या मार्गाने पालखीतून पारंपरिक पद्धतीने श्रींची मिरवणूक काढण्यात आली.

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा बांधकाम व्यावसायिक अमोल रावेतकर यांच्या हस्ते झाली. शनिवार पेठ परिसरात पारंपरिक चांदीच्या पालखीत श्रींची मिरवणूक काढण्यात आली.

मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपतीची प्राणप्रतिष्ठा उद्योगपती आदित्य शर्मा यांच्या हस्ते झाली. मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीची तुळशीबाग येथील उत्सव मंडपासून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. भव्य मूर्ती आणि आकर्षक सजावटींमुळे मिरवणूक अतिशय देखणी झाली. गणपतीची प्राणप्रतिष्ठा अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ संस्थान अन्नछत्राचे संस्थापक जन्मजेय राजेभोसले यांच्या हस्ते करण्यात आली.

‘केसरी’चे विश्वस्त सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक आणि विश्वस्त-मार्केटिंग मॅनेजर डॉ. प्रणिती रोहित टिळक यांच्या हस्ते दुपारी १.३० वाजता ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. वैभवशाली परंपरा लाभलेल्या केसरी गणेशोत्सवाचा हे शतकोत्तर रौप्य महोत्सव आहे. ऐतिहासिक परंपरेला साजेल अशी दिमाखदार मिरवणूक रमणबाग चौकातून सकाळी १०.३० वाजता सुरुवात झाली. शनिवार पेठेतील मूर्तीकार गोखले गुरुजी यांच्याकडून श्रींची मूर्ती घेऊन तेथून प्राणप्रतिष्ठेच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात दिमाखदार मिरवणूक लक्ष्मी रस्त्याकडे रवाना झाली. लक्ष्मी रस्त्यावर बाप्पाच्या स्वागतासाठी दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती. विजय चित्रपटगृह, माती गणपतीमार्गे मिरवणूक टिळक वाड्यात दाखल झाली.

आपली प्रतिक्रिया द्या