भटक्यांची पंढरी- मढी, एकदा तरी अनुभवावी

ganesh-puranik>> गणेश पुराणिक | नगर

नगर जिल्ह्यातील पाथर्डी रोडवर असणाऱ्या निवडुंगे गावापासून फक्त हाकेच्या अंतरावर मढी हे गाव आहे. गर्भगिरीच्या पर्वतरांगेमध्ये वृद्धेश्वर या देवस्थानापासून पाच किलोमिटर दूर सावरगाव गावामध्ये नाथपंथीयांमधील मच्छिंद्रनाथ तर तेथून उत्तरेकडे पाच किलोमिटर अंतरावर कानिफनाथ विराजनाम झाले आणि हेच गाव म्हणजे मढी.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूर हे वारकऱ्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र कानिफनाथांचे मढी हे गाव ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी याठिकाणी महाराष्ट्रातून लाखो लोकं (वडार, वंजारी समाज मोठ्या प्रमाणात येतात) दर्शनासाठी हजेरी लावतात. पूर्वीच्या काळी वडार, वंजारी ही लोक व्यवसायानिमित्त भटकंती करत असत. त्यामुळे वर्षभरात देव दर्शन आणि एकमेकांच्या भेटी-गाठी घेण्यासाठी मढी या ठिकाणी यात्रोत्सवाच्या काळात येत असत. त्यामुळे यास भटक्यांची पंढरी असे म्हटले जाते.

यात्रोत्सवाचा काळ

होळी ते गुढीपाडवा या काळामध्ये मढीमध्ये भाविकांची लक्षणिय उपस्थिती असते. याच काळामध्ये येथे मढीची प्रसिद्ध यात्र भरते. पाडव्याच्या पहाटे भक्तगण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात. यात्रेदरम्यान दर्शनस्थळी येण्यासाठी नगर आणि पाथर्डी येथून विशेष गाड्यांची सोय केली जाते. भक्तांची व्यवस्था करण्यासाठी कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी ट्रस्टने रुमची व्यवस्था केलेली आहे.

गाढवांचा बाजार हे खास आकर्षण

पाडव्याच्या आदल्या दिवशी फुलबागेतील बाजार प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीचे गाढवाचा बाजार भरतो. विविध जातीचे गाढवं याठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतात. यादरम्यान लाखांचा सौदा याठिकाणी होतो. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात यासह अन्य राज्यातील भाविक याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

गडावरील मंदिर आणि परिसर

मढी येथे गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये कानिफनाथांची पवित्र संजीवनी समाधी आहे. सभा मंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादीघर आहे. तेथे नाथ विश्रांती करत असत. समोरच्या बाजूला एक होमकुंड आहे. नाथांच्या गादीघराशेजारीच पूर्वेला श्री भगवान विष्णूचे मंदिर आहे. येथे असणारी भगवान विष्णूची मूर्ती इतर कोठेही पहावयास मिळत नाही. मंदिराशेजारीच श्री हनुमंतरायाची मूर्ती आहे. समाधी मंदिराच्या दक्षिणेला नवनाथांचे सर्वात मोठे गुरुबंधू श्री मच्छिंद्र्नाथ यांचे मंदिर आहे. तेथून सरळ पाहिले असता गर्भगिरी पर्वतावरील मच्छिंद्रनाथाच्या मंदिराचे दर्शन भाविकांना मिळते. या ठिकाणाला “लहान मायबा” या नावाने संबोधले जाते.

समाधी मंदिराच्या पश्चिमेला विठ्ठल-रखूमाईचे मंदिर असून मंदिराखाली नाथांचे साधना मंदिर आहे. येथे जाण्यासाठी एक भुयार आहे व तो एक पूर्वीच्या स्थापत्यशात्राचा आदर्श नमूना आहे. साधना मंदिरामध्ये शिवलिंग व नंदी आहे. विठ्ठल मंदिराच्या उत्तरेला श्री नवनाथाचे मंदिर व पारायण ठिकाण आहे. समाधी मंदिराच्या उत्तरेला श्री भवानीमातेचे मंदिर असून तेथे डाळींबीचे झाड आहे. त्याला भक्त जणांनी पूर्वी नाथभक्त होऊन गेलेल्या डाळीबाईच्या नावाने संबोधतात व त्या डाळींबीच्या झाडाला भक्त काही तरी संकल्प नवस करुन नाडा(धागा) बांधतात व श्री कानिफनाथ आजही त्या नवसाला पावून भक्तजणांच्या व्यथांचे निर्दालन करतात अशी भक्तांची भावना आहे. समाधी मंदिरामध्येनाथांची संजीवन समाधी असून कानिफनाथांची मनमोहक अशी संगमरवरी दगडाची मूर्ती तसेच नाथांचे वाहन असलेला व कान्होजी आंग्रेनी दिलेला पितळी घोडा व दत्तत्रयाची मूर्ती आहे. गडावर नगारखाना, बारदारी, भव्य सभा मंडप, पाण्याची टाकी तसेच समाधी मंदिरावरील असलेला प्रचंड कळस व त्यावरील भगवान शंकराचा त्रिशूळ हे मुख्य आकर्षण आहे. याच त्रिशूळाला भक्तगण यात्रेमध्ये काठ्या लावून आनंद उपभोगतात.

यात्रेचे वैशिष्ट्य, मोठ्या आकाराच्या रेवड्या

रंगपंचमीच्या दिवशी सुरू होणाऱ्या यात्रोत्सवासाठी राज्यभरातून भक्तांची मोठी गर्दी असते. यात्रा काळामध्ये येणाऱ्या भाविकांमुळे येथे मिठाई, फुलभांडारांची दुकाने सदैव सजलेली असतात. येथील मिठाईचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या आकाराच्या रेवड्या.

गावाकडे अनेक वेळा यात्रा उत्सवाच्या काळामध्ये तिळ आणि गुळापासून रेवड्या तयार केल्या जातात. त्यांचा आकार छोटा असतो. मढीच्या यात्रेतील रेवड्यांचा आकार मोठा असतो आणि त्याची चवही विशेष असते. या रेवड्या प्रत्येक भाविकाच्या आवडीच्या आहेत. या काळात तब्बल २ ते ३ लाखांची उलाढाल होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

काय आहे अख्यायिका?

भगवान श्रीकृष्णाच्या आदेशानंतर ९ नारायणांनी वेगवेगळ्या नाथांच्या रुपामध्ये भूतलावर अवतार घेतला. यापैकी एक श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयात एका हत्तीच्या कानामधून जन्म घेतला म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले. कानिफनाथांनी प्रर्दीर्घ काळ नाथसंप्रदायाचे काम केले. धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले. नाथ पंथाचे कार्य करत ते हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्हातील मढी या गावी फाल्गुन वद्य (रंगपंचमी)च्या दिवशी संजीवनी समाधी घेतली.

नवसाला पावणारे नाथ

कानिफनाथ मंदिर एका मोठ्या टेकडीवर आहे. या ठिकाणाविषयी सांगितले जाते की, राणी येसुबाई आणि बाळराजे शाहुमहाराज (पहिले) जेव्हा मोगलांच्या वेढ्यामध्ये होते. तेव्हा राणी येसुबाई यांनी कानिफनाथास नवस केला होता. ‘जर माझ्या शाहु महाराजांची सुटका ५ दिवसांच्या आत झाली तर मी कानिफनाथ गडाचा सभा मंडप, नगारखाना इ. बांधकाम तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करीन.’ त्यानंतर ५ दिवसांच्या आत राणी येसुबाई आणि शाहुराजे(पहिले) यांची सुखरुप सुटका झाली.

नवस फेडण्यासाठी राणी येसुबाई आणि शाहुराजे (पहिले) यांच्या आज्ञेने बडोद्याचे सरदार पिलाजी गायकवाड यांनी आपला कारभारी चिमाजी सावंत यास मढी येथे पाठवून त्याठिकाणी प्रचंड असे प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, पाण्यासाठी गौतमी बारव इ. भव्य बांधकाम केले तसेच कानिफनाथांच्या समाधीवर वैदिक पद्धतीने पूजा व्हावी म्हणून आणि फाल्गुन वद्य पंचमी (रंगपंचमी) या दिवशी भरणाऱ्या यात्रेची सर्व व्यवस्था पाहावी म्हणून छ्त्रपती शाहू महाराजांनी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण गंगाराम दीक्षित उपनान चौधरी काशीकर (वास्तव्य पैठण) यांना इ.स. १७४३ मध्ये सनद दिली. या अस्सल ऐतिहासिक पुराव्यावरून वैदिक पूजेची परंपरा मराठे राजे नाथांच्या समाधीच्या ठिकाणी ठेवित. समाधी मंदिरातील पितळी घोडा व सदोदीत तेवणारा नंदादीप सुप्रसिध्द मराठे सरदार कान्होजी आंग्रे व त्यांचा मुलगा बापुराव आंग्रे यांनी अर्पण केलेला आहे.

अध्यात्मिक, ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, आर्थिक अशा सर्व मानवी अंगांना फुलवणारी ही जत्रा एकदा तरी अनुभवावी.

संदर्भ – नगर ब्लॉगस्पॉट, धार्मिकस्थळे