मर्यादित आवाजात डीजे वाजवला तरीही पोलिसांची कारवाई


सामना ऑनलाईन, मुंबई

मर्यादित आवाजात डीजे वाजवला तरीही पोलीस डीजे व्यवसायिकांवर कारवाई करत असल्याची बाब उघडकीस आली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावरच राज्यभरात अनेक ठिकाणी पोलिसांनी नोटिसा पाठवून साऊंड सिस्टमची गोदामे सील केल्यामुळे डॉल्बी डीजे व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. याप्रकरणी डीजे साऊंड सिस्टम व्यावसायिकांनी हायकोर्टात धाव घेत दाद मागितली असून हायकोर्टाने याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.

राज्यातील डॉल्बी डीजे व्यावसायिकांवर दरवर्षी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याने प्रोफेशनल ऑडिओ आणि लायटिंग असोसिएशन या संघटनेने हायकोर्टात ऍड. सतीश तळेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करूनही पोलीस कारवाईचा बडगा उगारत आहेत. ऐन कमाईच्या हंगामातच पोलीस कारवाई करत असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याशिवाय साऊंड सिस्टम भाडय़ाने देणाऱ्यांवरही कारवाई होत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली.