बाप्पासाठी पालिका सज्ज, नऊ हजार कर्मचारी-अधिकारी तैनात

सामना ऑनलाईन, मुंबई

एक दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पालिकेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईतला गणेशोत्सव पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पर्यटक येत असतात. अशा वेळी कोणतीही दुर्घटना होऊ नये तसेच गणेशभक्तांच्या सोयीसाठी पालिकेने महिनाभर आधीपासून तयारीची सुरुवात केली होती. कृत्रिम आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांवर घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी व गणेशभक्तांच्या सोयीसाठी जीवरक्षक, मोटरबोट, जर्मन तराफा आदी यंत्रसामग्रीसह तब्बल नऊ हजार कर्मचारी, अधिकारी असे मनुष्यबळ तैनात केले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिकेने चौपाटय़ांसह गणेश विसर्जन स्थळांवर सर्व सुविधांनीयुक्त उत्तम अशी व्यवस्था केली आहे.

गिरगाव चौपाटीवर विशेष तयारी

गिरगाव चौपाटी ही दक्षिण मुंबई शहरातील एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रख्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली चौपाटी असून या चौपाटीवर दक्षिण व मध्य मुंबईतील अनेक छोटी- मोठी सार्वजनिक मंडळे आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी येतात. तसेच मान्यवर व्यक्ती, परदेशी पर्यटक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे गिरगाव चौपाटीवर प्रमुख गणेश मंडळांच्या गणपती विसर्जनासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.

आपत्कालीन विभाग सज्ज

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनांसहित मनुष्यबळाची व्यवस्था तसेच नियंत्रण कक्षामध्ये निष्णात डॉक्टरांसहित सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी टोइंग वाहने, क्रेन्स, जेसीबी मशीन्स, बुलडोझर विसर्जनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तैनात करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी 2 लाख 32 हजार मूर्तींचे विसर्जन

2017 मध्ये एकूण 2 लाख 32 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यापैकी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या मूर्ती

 • सार्वजनिक-11,098
 • घरगुती-1, 91, 254
 • एकूण- 2,02, 352

कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या मूर्ती

 • सार्वजनिक-652
 • घरगुती-28, 631
 • एकूण-29, 283

कृत्रिम तलावात विसर्जन करावे- महापौर

पालिकेने कृत्रिम तलावांची सोय केली असून जास्तीत जास्त गणेशभक्तांनी गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे, असे आवाहन महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले आहे. विसर्जनदिनी भक्तांनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या ठिकाणी तसेच विसर्जनप्रसंगी पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी. गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करताना समुद्रास येणारी भरती आणि ओहोटी लक्षात घेऊन समुद्रात जावे जेणेकरून अप्रिय घटना टाळता येतील, असे आवाहनही महापौरांनी केले आहे.

 • नैसर्गिक विसर्जन स्थळे-69
 • कृत्रिम विसर्जन स्थळे-31
 • चौपाटय़ांवर स्टील प्लेट-840
 • नियंत्रण कक्-58
 • जीवरक्षक-607
 • मोटरबोट-81
 • प्रथमोपचार केंद्र-74
 • रुग्णवाहिकांची संख्या-60
 • स्वागत कक्ष-87
 • तात्पुरती शौचालये-118
 • निर्माल्य कलश-201
 • निर्माल्य वाहन/डंपर-192
 • फ्लड लाइट-1991
 • सर्च लाइट-1306
 • निरीक्षण मनोरे-48
 • जर्मन तराफा-50
 • मनुष्यबळ (कामगार) – 6187,  (अधिकारी)- 2417