आरतीचे ‘उच्चारण’ महत्त्वाचे!

>>>ज्योत्स्ना गाडगीळ

डॉल्बीचा कानठळ्या बसवणारा आवाज, डीजेचा उत्तेजक सूर, ढोल पथकांची थाप आणि लोकांचा धिंगाणा याला आता बाप्पाही सरावला आहे. त्यात आपण भर घालतो, अशुद्ध उच्चारांत म्हटलेल्या आरतीची! एकंदरीतच बाप्पाच्या कानांवर अत्याचार! ही परिस्थिती सुधारावी, म्हणून पुण्याची सायली भगली-दामले आपल्या चित्रकलेतून करत आहे, एक मार्मिक प्रयत्न -लोकांचे आरतीचे उच्चार सुधारण्याचा!

‘भक्ती नको, पण आरती आवर!’ असे म्हणण्याची वेळ बाप्पावर येऊ नये, म्हणून गरज आहे, ती आरतीतले उच्चार सुधारण्याची! आरतीचे समूहगान सुरू असताना `संकष्टी पावावे’, `फळीवर वंदना’, `लवलवती विक्राळा’ असे उच्चार सहज खपून जातात. पण बाप्पाचे सूपासारखे कान अशुद्ध उच्चार सहज ऐकू शकतात. भक्ताचा भाव सच्चा असला, तरी त्याच्या चुकीच्या शब्दांमुळे बाप्पाला फारच त्रास होतो आणि चुकीच्या उच्चारांची परंपरा पुढे सुरू राहते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपदेशात्मक भाषा न वापरता चित्रकार सायली भगली-दामले हिने आपल्या व्यंगचित्रांमधून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या प्रयत्नाला भाविकांबरोबरच खुद्द बाप्पानेही दाद दिली आहे. त्यामुळे यंदा आरती म्हणताना सायलीची चित्रे नजरेसमोर ठेवून, भाविक कमीत कमी चुका करतील, अशी आशा बाप्पाने व्यक्त केली आहे.

बाप्पाला एवढी खात्री वाटण्याचे कारण, सायलीने काढलेली सुंदर व्यंगचित्रे! ती पाहता तुम्हाला हसू येईलच, पण तिने सुचवलेल्या सुधारणा डोक्यात फिट्ट बसतील.

तजेलदार रंगसंगती, हसरे आणि खट्याळ चेहरे, भरीव रेषा, मार्मिक संदेश ही सायलीच्या चित्रातली बलस्थाने आहेत. तिची चित्रे आपलीशी वाटतात. चित्रातील व्यक्तीरेखा आपल्याला बालविश्वात घेऊन जातात. साधी-सोपी चित्रशैली पाहून आपणही चित्र काढण्याचा प्रयत्न करून पाहावा, असे सहजच वाटून जाते. मात्र सदर चित्रशैली सायलीने महत्प्रयासाने आत्मसात केली आहे. आता तर तिचे चाहते, चित्राखाली नाव न पाहताही, ते सायलीनेच काढलेले चित्र आहे, हे ओळखतात.
सायलीच्या चित्रांवर प्रख्यात चित्रकार मारिओ मिरांडा यांच्या व्यंगचित्रांचा प्रभाव दिसतो. बालपणापासूनच तिला चित्रकलेची आवड होती. नृत्याच्या क्लासला जाण्यासाठी कंटाळा करणारी सायली, चित्रकलेच्या क्लासला सुटीच्या दिवशीही हजेरी लावत असे. पाचवी ते आठवीमधे तिने चित्रकलेच्या शिक्षकांकडून ग्लास पेंटिंग, कॅलिग्राफी , पोट्र्रेट डॉर्इंग, शेडिंग असे सगळे प्रकार शिकून घेतले. तिला करिअरही चित्रकलेतच करायचे होते. त्यासाठी मुंबईतल्या जेजे महाविद्यालयाची तिने निवड केली. आईने तिला पूर्ण पाठिंबा दिला. बम्बय्या संस्कृतीशी जुळवून घेताना तिची थोडी दमछाक झाली, परंतु कॉलेजमधले शिक्षक आणि नवीन मित्रपरिवार यांच्यामुळे चार वर्षांत ती मुंबईकर झाली.

`इलस्ट्रेशन’ हा विषय घेऊन ती पदवीधर झाली. तर, आयआयटी बॉम्बे येथून तिने `व्हिज्युअल कम्युनिकेशन’ विषय घेऊन तिने पदव्युत्तर प्रशिक्षण पूर्ण केले. `परसिस्टंट सिस्टिम’ ह्या कंपनीत ती सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामाला आहे. मात्र सध्या आपल्या सात महिन्यांच्या `मैत्रा’ साठी तिने रजा घेतली आहे. तीळामासाने मोठी होणाऱ्या आपल्या लेकीचे फोटो केवळ कॅमेऱ्यात कैद न करता, सायली चित्रातून तिचे बालपण कागदावर साकारते आहे. आयुष्यात ज्या गोष्टी सायलीला प्रत्यक्षात करता आल्या नाहीत, त्या गोष्टी ती चित्रांच्या माध्यमातून जगते. त्याची चित्रमाला तयार करते.

saylee-9सायली सांगते, `मी संयुक्त कुटुंबात वाढले. `विद्यश्री’ ह्या आमच्या घरात २५ जणांचे कुटुंब आणि त्यात आम्हा ९ भावंडांचा नुसता हैदोस चालत असे. मोठ्यांची शिकवण, पारंपरिक गोष्टी, भावंडांची साथ ह्या सकस वातावरणामुळे माझे बालपण समृद्ध झाले. माझ्या चित्रकलेला आईने प्रोत्साहन दिले. `बीए, बीकॉम अनेक होतील, पण चित्रकार एखादाच!’ या तिच्या शब्दांनी मला मुंबापुरीत तग धरण्याचे बळ मिळाले. वडिलांनीही दुजोरा दिला. `जेजे’च्या शिक्षकांनी चित्रकलेला वळण लावले, तर कलाकार मित्रांनी कल्पकतेला चालना दिली. लग्नानंतरही माझ्या कामात खंड पडला नाही. त्याचे श्रेय मी माझ्या सासू-सासऱ्यांना देईन. नवरा पद्मनाभ एवढ्या मिस्किल स्वभावाचा आहे, की त्याच्या छोट्या-छोट्या परंतु, मार्मिक टिप्पणीतून मला चित्रकलेसाठी नवनव्या कल्पना सुचत असतात. `उच्चारण’ ही चित्रमाला सुरू करण्यात आणि तिचा व्यावसायिक प्रचार करण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. तर माझा मित्र डॉ. अमित करकरे ह्याने चित्राखाली चारोळी पेरून चित्रमालेची चौकट पूर्ण केली आहे.’

sayalee-8

सायलीने म्हटल्याप्रमाणे तिने काढलेली चित्रे सोशल मिडीयापुरती मर्यादित न राहता, त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त व्हावे, म्हणून पद्मनाभ ह्यांनी त्या चित्रांचे प्रिंट असलेले टी-शर्ट, कप, कीचेन, फ्रिज मॅग्नेट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. ह्या उत्पादनांनाही मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. आपल्या कलाकृतीला एवढा प्रतिसाद मिळेल, अशी सायलीने कल्पनाही केली नव्हती.

ती सांगते, `उच्चारण’ ही चित्रमाला साकारताना सुरुवातीलाच मी एक प्रस्तावना दिली होती. `सामाजिक माध्यमातून आलेल्या संदेशाचे हे स्वैर कलात्मक रूप असून ह्यामागे कोणाच्या वैयक्तिक, धार्मिक, जातीय, राजकीय, सामाजिक भावना किंवा श्रद्धा दुखावणे किंवा चेष्टा करणे हा उद्देश नाही.’ ह्या प्रस्तावनेसोबत असलेली चित्रे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली, परंतु ही प्रस्तावना माझ्या अकाऊंटपुरती मर्यादित राहिली. सुदैवाने अजूनपर्यंत कोणी टीका केलेली नाही, उलट ह्या चित्रमालेचे स्वागतच केले आहे. त्यामुळे आपण काहीतरी विधायक करू शकलो, याचा मला आनंद मिळत आहे.’

सायलीचा बोलका स्वभाव आणि आनंदी व्यक्तिमत्त्व तिच्या प्रत्येक चित्रातून डोकावते. या सर्व चित्रांचे संकलन करून भविष्यात पुस्तक प्रकाशित करावे आणि एखाद्या विषयावर चित्रप्रदर्शन भरवावे, अशी तिची इच्छा आहे. त्यादृष्टीनेही तिने प्रयत्न सुरू केले आहेत.

याशिवाय सायली लग्न अथवा इतर समासंभाच्या पत्रिका, विविध प्रसंगी दिली जाणारी शुभेच्छापत्रके अशा अनेक गोष्टी मागणीनुसार उपलब्ध करून देते. गणेशोत्सवानंतर नवरात्र आणि दिवाळीवर आधारित चित्रमाला करण्याचा तिचा विचार आहे.

सायलीच्या प्रामाणिक प्रयत्नांवर बाप्पा प्रसन्न झाला आहेच, तसाच तो आपल्यावरही प्रसन्न व्हावा असे वाटत असेल, तर आपणही शुद्ध, स्पष्ट आणि सुरेल आरती म्हणून बाप्पाचा पाहुणचार करूया आणि सोबतीला सायलीने काढलेल्या चित्रांचीही मदत घेऊया.

सायलीने काढलेल्या चित्रांनी जर तुम्हालाही थोडेफार समाजप्रबोधन करायचे असेल, तर संपर्क साधा : ८८०५९९०४३२