हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘राजां’चे मुखदर्शन

सामना ऑनलाईन, मुंबई

‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’ अशा जयघोषात हजारो भाविकांना आज ‘लालबागचा राजा’ आणि गणेशगल्लीतील ‘मुंबईचा राजा’चे मुखदर्शन झाले. या मुखदर्शन सोहळय़ांसाठी लालबाग गणेशोत्सवापूर्वीच लालबागचा परिसर भाविकांनी फुलून गेला होता.

लालबागचा राजा’ समोर यंदा ऑगमेंटेड रिऍलिटी म्हणजेच एखादे दृश्य जिवंत स्वरूपात समोर दिसणे या तंत्रज्ञानाचा अनोखा कलाविष्कार प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारला आहे. हिरव्यागार निसर्गात फेसाळणारे धबधबे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि या निसर्गात वावरणारे प्राणी असे डोळय़ांचे पारणे फेडणारे दृश्य ‘लालबागच्या राजा’जवळ भाविकांना पाहता आले. हजारो कॅमेरे आणि मोबाईलमध्ये भाविकांनी तो नजारा आणि बाप्पाची अप्रतिम मूर्ती टिपली.

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली येथेही 22 फुटी अश्वारूढ गणरायाचे मुखदर्शन आज भाविकांना घडले. ग्वाल्हेर येथील सूर्यमंदिराच्या हुबेहूब प्रतिकृतीमध्ये विराजमान झालेल्या या ‘मुंबईचा राजा’चे मुखदर्शन सोहळाही आकर्षक ठरला.