एस.टी. कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाची भेट

st bus

सामना ऑनलाईन, मुंबई

एसटी महामंडळात सध्या कार्यरत असलेल्या चालक-वाहक, सहाय्यक,  शिपाई या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना येथून पुढे लिपिक-टंकलेखक या पदासह वर्ग-3 मधील बढती प्रक्रियेमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील, अशी घोषणा परिवहनमंत्री व एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने केली आहे.

एसटी महामंडळात सुमारे एक लाख चार हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी 60 ते 70 हजार कर्मचारी चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई अशा विविध चतुर्थ श्रेणी पदावर कार्यरत आहेत. आतापर्यंत अनेक कर्मचारी एकाच पदावर रुजू होऊन 30-35 वर्षे सेवा बजावून त्याच पदावर निवृत्त झाले आहेत. दरवर्षी नित्यनियमाने मिळणारी वेतनवाढ सोडली तर त्यांना वरिष्ठ पदावरील बढती प्रक्रियेत कोणतेच स्थान नव्हते. यापुढे या कर्मचाऱ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे शैक्षणिक अर्हता व सेवाज्येष्ठतेनुसार लिपिक-टंकलेखक पदासह वर्ग-3 मध्ये बढती दिली जाणार आहे. वर्ग-3 पदाच्या एकूण भरती प्रक्रियेतील 25 टक्के जागा अशा प्रकारे भरण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना हा सुखद धक्का देत अनोखी भेट दिल्याने कामगारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.