ताशांचा आवाज तरारारा झाला… न गणपती माझा नाचत आला

4

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि विघ्नहर्त्या गणरायाचे गुरुवारी ढोलताशाच्या गजरात वाजतगाजत आगमन झाले. महागाई आणि दुष्काळाचे सावट असतानाही लाडक्या गणरायाचे भक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात हर्षोल्हासात स्वागत केले. ‘आले रे आले गणराय आले’च्या गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. सकाळपासून जिल्हा परिषदेच्या मैदानावरील दुकानांमधून श्रींची मूर्ती खरेदी करण्यासाठी आबालवृद्धांनी मोठ्या भक्तीभावाने लाडक्या बाप्पांना आज वाजतगाजत आपल्या घरी विराजमान केले. डोक्यावर गणपती बाप्पा मोरया गिरवलेली टोपी, कपाळावर भगवी पट्टी आणि गुलालाची उधळण करीत हातात, डोक्यावर मूर्ती घेतलेल्या गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर बाप्पांच्या आगमनाचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. तर प्रत्येक रिक्षा आणि वाहनांत ‘ताशाचा आवाज तरारारा झाला न् गणपती माझा नाचत आला’ गाणे भक्तांच्या आनंदात भर घालताना दिसत होते.

आज गणेश चतुर्थी असल्याने लाडक्या बाप्पांचे आगमन होणार या आनंदाने भारावलेल्या आबालवृद्धांनी गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी सकाळी आठ वाजेपासूनच जिल्हा परिषदेच्या मैदानावर गर्दी केली होती. शिवसेना भवनाच्या समोरील रस्त्यावर दुतर्फा गणेशाच्या पूजेचे साहित्य विक्री करणारी दुकाने थाटली होती यात पाच प्रकारची फळे आणि गणरायाच्या मखरीसाठी लागणारे सजावटीचे साहित्य विक्री करणाNया दुकानांच्या रांगा लागल्या होत्या. या रांगांतून वाट काढीत गणेशभक्त आवडत्या श्रींची मूर्ती खरेदी करण्यासाठी मैदानाकडे जात होते. त्यामुळे दुचाकी वाहने आणि भाविकांची एकच झुंबड आज या मैदानावर पहायला मिळाली.

विविध बाजारांत मूर्तींची मोठी विक्री
शहरातील जिल्हा परिषदेचे मैदान, गजानन महाराज मंदिर परिसर, मुवुंâदवाडी, टी. व्ही. सेंटर आणि छावणी या ठिकाणच्या बाजारांमध्ये आज लहानापासून महाकाय मूर्तींची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. दिवसभर आज गुलालाची उधळण केल्याने शहरातील रस्ते गुलालाने लालबुंद झाले तर दिवसभर ‘आले रे आले गणराज आले’, ‘एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’, मोरया रे बापा मोरया रे’ च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.

७७२ मंडळांची नोंदणी
धर्मादाय आयुक्त कार्यालयात यंदा ७७२ सार्वजनिक गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे. यात ३१० मंडळांनी ऑनलाईन, तर ४६२ मंडळांनी ऑफलाईन नोंदणी केली. गतवर्षी ६०० मंडळांनी नोंदणी केली होती, यंदा १७२ मंडळांची वाढ झाल्याची माहिती धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी दिली.

महिलांची मोठी गर्दी
आवडती श्री मूर्ती खरेदी करण्यासाठी यावर्षी तरुणी आणि महिलांनीही मोठी गर्दी केली होती. लहान मुली आणि तरुणीसुद्धा डोक्यात गणपतीची भगवी टोपी आणि डोक्याला भगवी पट्टी बांधून गणरायाचा जयघोष करीत मूर्ती नेताना दिसल्या. महिलांनीही आपल्या यजमानासोबत गणरायाला हर्षोल्हासाने घरी नेले. मोठमोठ्या मूर्ती खरेदी करणाNया मंडळांच्या कार्यकत्र्यांनी मोठमोठ्या वाहनातून गणरायाची मूर्ती ढोलताशाच्या तालावर नाचत आणि गुलालाची उधळण करीत मंडळांच्या ठिकाणी विराजमान केल्या.

अनेक नावांचा धनी गणपती
गणांचा अधिष्ठाता म्हणजे गणपती. सर्वत्र भरून उरलेल्या परमेश्वराची ऊर्जा, विद्येचा पती तो विद्यापती, विघ्नांचा नाश करणारा तो विघ्नेश्वर आहे. असा हा गणराया, गौरीतनया, गणपती देवा, मोरया, शूर्पकर्णा, दयाघना, गजवदना, भालचंद्र, लंबोदराची मनोभावे आराधना करूया…बोला, गणपती बाप्पा मोरया !

रात्री उशिरापर्यंत मिरवणूक
शहरातील मोठमोठ्या गणेश मंडळांच्या महाकाय गणेशमूर्तींची मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. डिजीटल लायटिंग आणि बॅण्ड, ढोलांच्या दणदणाटात गणरायाच्या मूर्तंींच्या मिरवणुकीने टिळकपथ, गुलमंडी, संभाजीपेठ दणाणून गेली होती. या मिरवणुकीत बाळकृष्ण मंदिरातील शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या जंबो ढोलपथकाने टिळकपथ दणाणून सोडला. या पथकात पेâटे बांधलेल्या ढोलवादक चारपाचशे तरुण-तरुणींनी जोशात ढोलवादन करून मिरवणुकीत चैतन्य आणले. त्यापुढे सुखकर्ता मित्रमंडळाच्या मुलांनीही छान ढोलवादन केले. त्यानंतर नादब्रह्म ढोलपथकातील युवक-युवतींनी मिरवणुकीची शोभा वाढवली. त्यानंतर जागृती गणेश मंडळ आणि नंतर चतुर्थीचा राजा गणेश मंडळाच्या भव्य मूर्तीसमोर शेकडो तरुणांचा बेधुंद नाच गणरायाच्या आगमनाचा उत्साह वाढवत होता. त्यानंतर ब्राह्मण महासंघाच्या वतीने सर्व गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले.