दिवा-सावंतवाडी पॅसेंजरच्या महिला प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड

दिवा-सावंतवाडी पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या पर्समधील किमती ऐवज शिताफीने चोरणाऱ्या तिघींना रेल्वे क्राइम ब्रँचच्या विशेष कृती दलाने अटक केली. आरोपींकडून तीन गुह्यांची उकल करीत पोलिसांनी सहा लाख १५ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

दिवा रेल्वे स्थानकातून सुटणाऱया दिवा-सावंतवाडी पॅसेंजरमधील महिला प्रवाशांच्या पर्सची चेन उघडून किमती ऐवज चोरीला जाण्याचे गुन्हे वाढले होते. दरम्यान, महिलांची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली होती आणि ते फुटेज रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या हाती लागले होते. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय महादेव ढाकणे, कॉन्स्टेबल सतीश क्षीरसागर, विजय ढवळे, प्रवीण घार्गे, महादेव शिंदे, लक्ष्मण कुटे, गीतांजली रासकर, मीनल गुरव या पथकाने शोध सुरू केला. या महिला संभाजीनगरातून नंदीग्राम एक्स्प्रेसने कल्याणमध्ये येऊन दिवा स्थानक गाठून हातसफाई करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने संभाजीनगरपासून त्या महिलांवर वॉच ठेवला आणि त्या कल्याण स्थानकात उतरताच त्यांना अटक करण्यात आली.

काही सेकंदांत पर्स रिकामी

प्रिया भोसले (३५), राधा काळे (२३) आणि सुनीता मिसाळ (२८) अशी या महिलांची नावे असून तिघीही संभाजीनगरातल्या जोगेश्वरी झोपडपट्टीत राहतात. त्या तिघींनी तीन गुह्यांची कबुली दिली.