राजापूरची गंगा आली! ऐन शिमगोत्सवात गंगास्नानाची पर्वणी ग्रामदेवतांच्या पालख्याही जाणार भेटीला

राजापूर तालुक्यातील उन्हाळे येथील गंगा तीर्थक्षेत्री गंगामाईचे आगमन झाले आहे. गंगामाईचे गेल्या काही वर्षांत सातत्याने आगमन आणि निर्गमन होत आहे. आता सुमारे सहा महिन्यानंतर पुन्हा गंगामाईचे आगमन झाले आहे.

शिमगोत्सवाच्या काळामध्ये गंगामाईचे आगमन झाल्यास अनेक गावच्या ग्रामदेवतांच्या पालख्या गंगामाईच्या भेटीला जातात. गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रथा परंपरा गावोगावी जपली गेली आहे. यंदाही शिमगोत्सवात गंगामाईचे आगमन झाल्यामुळे ग्रामदेवतेची पालखी गंगामाईच्या भेटीला जातील. यावेळी ग्रामस्थ गंगास्नानाची पर्वणी साधतात.

भाविकांची गर्दी वाढू लागली
गंगा देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत घुगरे यांनी सांगितले की, गंगामाईचे रविवारी पहाटे आगमन झाले आहे. मूळ गंगेसह सर्व पुंडांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. गंगामाईच्या आगमनाची बातमी समजताच महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून भाविक उन्हाळे गावी दाखल होतात. आताही गंगा तीर्थक्षेत्री भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. शिमगोत्सवासाठी मोठय़ा संख्येने चाकरमानी गावी आले आहेत. गंगामाईचे आगमन ही त्यांच्यासाठी पर्वणी आहे.