प्रॉपर्टीचा वाद मिटवण्यासाठी अबू सालेमला पाहिजे सुट्टी

109

सामना ऑनलाईन । मुंबई

लखनौ व आझमगड येथे असलेल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरून आम्हा भावंडांमध्ये वाद सुरू असून माझी प्रॉपर्टी मला मिळावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी तिकडे जाणे गरजेचे असल्याने मला सुट्टी द्यावी असा विनंती अर्ज कुख्यात गँगस्टर अबू सालेमने तळोजा तुरुंग अधीक्षकांना केला आहे.

एकेकाळी डॉन दाऊदसाठी काम केल्यानंतर स्वतःची टोळी सुरू करणारा आणि अनेक गुह्यांत सहभागी असणारा गँगस्टर अबू सालेम सध्या तळोजा कारागृहात आहे. पोर्तुगालमधून प्रत्यार्पण केल्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी लग्न करण्यासाठी सुट्टी द्यावी अशी विनंती सालेमने केली होती, पण आता सुट्टी मिळावी यासाठी त्याने प्रॉपर्टी वादाचे कारण पुढे केले आहे. आम्ही चार भाऊ असून एक बहीण आहे. आझमगड आणि लखनौ येथे आमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीवरून आमच्या कुटुंबीयांमध्ये वाद सुरू असून त्या प्रॉपर्टीची आम्हाला वाटणी करायची आहे. त्यासाठी त्या ठिकाणी जाणे गरजेचे असल्याचे सालेमने तुरुंग प्रशासनाला ‘फर्लो’साठी लिहिलेल्या अर्जात म्हटले आहे.

काही नातेवाईक व गावाकडच्या लोकांनी बनावट कागदपत्रे बनवून माझी प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा वेळीच संबंधित विभागांचे त्याकडे लक्ष वेधल्यामुळे प्रॉपर्टी हडप करता आली नाही. त्यामुळे गावी जाऊन प्रॉपर्टीची वाटणी केल्यानंतर मला माझी प्रॉपर्टी नीट सांभाळून ठेवता येईल यासाठी तिकडे जाणे आवश्यक असल्याने ‘फर्लो’ मंजूर करावी अशी सालेमची विनंती आहे. दरम्यान, याबाबत तुरुंग प्रशासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून कायदेशीर बाबी पडताळून पाहिल्या जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या