आरत्यांचे वैशिष्टय़

दा. कृ. सोमण, पंचागकर्ते

पाचसहा कडवी असलेले, ध्रुवपदात ‘आरती’, ‘ओवाळणे’ हे शब्द असलेले गेय पद्य म्हणजेच आरती होय. आरतीमध्ये नादानुकारी आणि रसानुकूल शब्दयोजना केलेली असते. शेवटी ती रचना करणाऱयाचे नाव गुंफलेले असते. सगुणोपासक भक्तांवर आपल्या मनातील भाव प्रकट करण्यासाठी आरत्यांची रचना केलेली आहे. मनातील आर्त भावभक्ती देवतांपुढे आरतींद्वारे प्रकट केली जाते. देवाला नैवेद्य अर्पण करताना नैवेद्यारतीही म्हणण्याची प्रथा होती, आरतीच्या वेळी वापरण्यात येणाऱया वस्तूंवरूनही आरतींना नावे दिलेली आहेत. दीपारती, धूपारती, निरांजन आरती, कर्पूरारती, पंचारती, काकडारती अशी नावे प्राप्त झालेली आहेत. देवदेवतांबरोबरच सत्यनारायण, संकष्ट चतुर्थी यांच्याही आरत्या रचलेल्या आहेत. सूर्य, चंद्र, शनी इत्यादींच्या आरत्यांबरोबरच गरुड, शेषनाग यांच्याही आरत्या रचलेल्या आहेत. बारा ज्योतार्ंलगे, केदार, पंढरपूर इत्यादी क्षेत्रांच्याही आरत्या रचलेल्या आहेत. निवृत्ती, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास, मोरया गोसावी यांना उद्देशूनही आरत्या आहेत.

गणेशाची आरती आता दहा दिवस दणक्यात केली जाईल. पण ही आरती आपण का म्हणतो…? त्यामागे काय हेतू आहे…

हिंदुस्थानी भक्तिरस साहित्यात आरत्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गणपती उत्सवाच्या काळात गणेशपूजनानंतर आरती म्हणण्याच्या वेळी लहानथोर सर्व मंडळी उत्साहात एकत्र येतात. कोणत्याही देवतेची पूजा असली तरी प्रारंभी गणपतीची आरती म्हणून नंतर इतर आरत्या म्हटल्या जातात.

मराठी भाषेच्या आरंभापासून आरत्यांची रचना केलेली आढळते. इसवी सनाच्या बाराव्या शतकातील महानुभाव कवींनी आरत्यांची प्रथम रचना केली. आधुनिक संतांच्या शिष्यांनीही गुरूंच्या आरत्या रचून गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. सिद्धारूढस्वामी, अक्कलकोटचे स्वामी गोंदवलेकर महाराज, साईबाबा, गुरुदेव रानडे अशा कितीतरी सत्पुरुषांच्या आरत्या रचलेल्या आहेत. नामदेवांनी विठ्ठलाच्या बऱयाच आरत्या रचल्या आहेत. नित्यारती, काकडारती, शेजारती अशा विविध प्रकारच्या आरत्याही त्यांनी लिहिल्या आहेत. नंतरच्या काळात गुरुचरित्रकार गंगाधर सरस्वती, दासोपंत, नरहरी, विष्णुदास नामा, त्र्यंबक, कृष्णदास इत्यादी कवींनी आरत्यांची रचना केली. पुढे सोळाव्या शतकात एकनाथ, रामा जनार्दन, विठा रेणुकानंद, कृष्णदास, अनंतसुत इत्यादी कवींनी आरत्यांची रचना केलेली आढळते.

एकनाथांचा नातू मुक्तेश्वर यांनीही काही वैशिष्टय़पूर्ण आरत्यांची रचना केलेली आहे. पुढे सतराव्या शतकात तुकाराम, रामदास यांनीही सुंदर आरत्यांची रचना केलेली आढळते. संत तुकारामांच्या आरत्या विशेष भावपूर्ण आहेत. संत रामदासांच्या आरत्यांमध्ये शब्दप्रभुत्व, आशय आणि काव्य यांचा सुंदर संगम आढळतो. वामन, रघुनाथ या पंडित कवींच्या आरत्याही लोकप्रिय झालेल्या आहेत.

घालीन लोटांगण!

आरत्या म्हणून झाल्यावर ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण’ हे भजन म्हणण्याची पद्धत आहे. या भजनातील भक्तिपूर्ण आशयामुळे आणि त्याच्या सुंदर चालीमुळे वातावरण प्रसन्न होत असते.

या भजनाची रचना कुणा एका कवीने केलेली नाही. यातील पहिलं कडवं  ‘घालीन लोटांगण…’ हे संत नामदेवांचे आहे. दुसरं कडवं ‘त्वमेव माता…’ हे शंकराचार्यांच्या गुरुस्तोत्रातील आहे. तिसरं कडवं ‘कायेन वाचा…’ हे श्रीमद्भागवतातील आहे. चौथं कडवं ‘अच्युतं केशवं…’ हे शंकराचार्यांच्या ‘अच्युताष्टकम्’मधील आहे… आणि शेवटचं ‘हरे राम, हरे राम….’ हे उपनिषदातील आहे.

हे भजन झाल्यानंतर ‘मंत्रपुष्पांजली’ म्हटली जाते. काही भक्त ‘पसायदानही’ म्हणतात. आधुनिक काळात कवींनी भारतमातेच्या आरत्या लिहून राष्ट्रभावना वाढविणे गरजेचे आहे.

पूर्वी लोकसंख्या कमी होती, त्यावेळी गणेशमूर्तींची व गणेशोत्सवांची संख्याही कमी होती. वाढत्या लोकसंख्येबरोबरच गणेशोत्सवांची संख्याही वाढली आहे. गणेशोत्सव हे धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरे व्हावयास पाहिजेत हे जरी खरे असले तरी हे उत्सव साजरे करीत असताना ध्वनिप्रदूषण आणि जलप्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावयास हवी.

आरत्या या ओरडून मोठय़ा आवाजात आणि अशुद्ध उच्चारात म्हणू नयेत. त्या मधुर आवाजात शांत व प्रसन्न चित्ताने म्हणाव्यात. श्री गणरायाला आणि उपस्थित राहून ऐकणाऱयांना आरत्या ऐकून आनंद वाटला पाहिजे. वातावरण मंगल व प्रसन्न झाले पाहिजे.