‘काळाचौकीच्या महागणपती’सह बड्या मंडळांचे राजे निघाले दरबाराकडे


सामना ऑनलाईन । मुंबई

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषांनी दुमदुमलेला आसमंत, ढोलताशांचा गजर, हातात भगवे झेंडे घेऊन पारंपरिक वेशभूषा आणि मंडळांचे टी-शर्ट घालून आलेले शेकडो कार्यकर्ते तर दुसरीकडे बाप्पाची पहिली छबी मोबाईल आणि कॅमेर्‍यात टिपण्यासाठी सुरू असलेली लगबग अशा उत्साहपूर्ण वातावरणात रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत लालबाग-परळमधील गणेशचित्र शाळांमधून ‘काळाचौकीच्या महागणपती’सह बड्या मंडळांचे बाप्पा आपल्या मंडपाकडे रवाना झाले.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सजावटीसाठी  आतापासूनच बड्या मंडळांचे राजे आपल्या दरबाराकडे निघाले आहेत. भारतमाता येथील रेश्मा खातू यांच्या चित्रशाळेतून दुपारी 12 च्या सुमारास ‘काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळा’च्या ‘महागणपती’चा आगमन सोहळ्याला सुरुवात झाली. ‘श्रीं’च्या चरणाची पालखी, ध्वजपथक, ढोलपथक यांच्या कलात्मकतेचा अविष्कार यासोबत दशानन रावण, संकासुर, उंदीरमामा यांचाही कलाविष्कार ‘काळाचौकीच्या महागणपती’च्या सोहळ्यात पाहायला मिळाला.

‘ग्रॅण्ट रोडचा महाराजा’, ‘कुंभारवाड्याचा राजा’ आदी मंडळांच्या बाप्पांचाही आगमन सोहळादेखील मोठ्या जल्लोषात पार पडला. अधूनमधून वरुणराजानेही हजेरी लावत बाप्पावर फुलांचा वर्षाव केला. लालबाग-परळ परिसरातील भाविकांची गर्दी पाहता पोलिसांचा चोख बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला होता.

दरवर्षी लोअर परळ पुलावरून या परिसरातील शंभरहून अधिक मंडळांच्या बाप्पांचे आगमन-विसर्जन होते. यंदा हा पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथून आगमन-विसर्जन होणार्‍या मंडळांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था लवकरात लवकर करून द्यावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहीबावकर यांनी महापालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाकडे केली आहे.