बुकिंग सुरू होण्याआधीच गणपती विशेष गाडी रद्द!

मध्य रेल्वेकडून गणपतीसाठी सोडण्यात आलेल्या विशेष गाडय़ांचे आज सकाळी बुकिंग सुरू झाले खरे, पण त्याआधीच ऑनलाईन बुकिंग करणाऱया अनेक प्रवाशांना लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगलोर (01165) ही गाडी रद्द झाल्याचा मेसेज स्क्रीनवर दिसत होता. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळावे म्हणून धडपडणारे प्रवासी चांगलेच चक्रावले. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून पंधरा मिनिटे चाललेला हा तांत्रिक खेळ थांबला खरा, पण तेव्हा सदर गाडीचे बुकिंग फुल्ल झाल्याचे दिसले. त्यामुळे रेल्वने सोडलेल्या विशेष गाडय़ांमध्ये तरी आपल्याला कन्फर्म तिकीट मिळेल म्हणून ऑनलाईन बुकिंगसाठी प्रयत्न करणाऱया अनेक चाकरमान्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.

गणेशोत्सव यंदा 19 सप्टेंबर रोजी असल्याने मुंबई, ठाण्यात वास्तव्याला असलेल्या चाकरमान्यांची रेल्वेच्या तिकीटासाठी धावपळ सुरू आहे. मध्य रेल्वेने पहिल्या टप्प्यात 156 गणपती विशेष गाडय़ा कोकणसाठी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील बहुतांश गाडय़ांचे बुकिंग फुल झाल्याने रेल्वेने पुन्हा 52 गाडय़ा गणपती विशेष गाडय़ांची घोषणा केली आहे. त्यानुसार सदरच्या गाडय़ांचे बुकिंग आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाले. त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते मेंगलोर या विशेष गाडीचे बुकिंग करण्यासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर अनेक प्रवाशांनी लॉगिन केले तेव्हा सदरची गाडी 16 सप्टेंबरपासून पुढे तीन दिवस रद्द असल्याचा मेसेज स्क्रीनवर दिसला. त्यामुळे अनेकांना बुकिंग सुरू झाल्यानंतरही तिकीट बुक करता आले नाही. मात्र रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर मात्र बुकिंग सुरू होते. ऑनलाईन तिकीट बुकिंगमधील हा गोंधळ पंधरा मिनिटांत संपला खरा, पण या वेळेत रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर बुकिंग सुरू असल्याने काही वेळातच बुकिंग फुल झाले. त्यानंतर मात्र आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरही सदर गाडीचे बुकिंग फुल झाल्याचे दिसले. त्यामुळे अनेकांना रेल्वेचे तिकीटच मिळू शकले नाही.

रेल्वे म्हणते, सर्व सुरळीत

गणपतीच्या विशेष गाडीचे बुकिंग सुरू होण्याआधी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मेंगलोर ही गाडी आनलाईनवर रद्द करण्यात आल्याचा मेसेज प्रवाशांना दिसत असल्याबाबत रेल्वेकडे विचारणा केली असता सर्व काही सुरळीत असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी स्पष्ट केले. सकाळपासूनच रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर आणि ऑनलाईन असे दोन्ही ठिकाणी योग्यपणे बुकिंग सुरू होते. त्यानुसार अनेकांनी या गाडीचे बुकिंगही केले असल्याचे त्यांनी सांगितले.